सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं. कर्णधार मनिष पांडेच्या नेतृत्वाखाली रविवारी कर्नाटक टीमने ही स्पर्धा जिंकली. या विजेतेपदासोबतच दुहेरी आनंद मनिषच्या आयुष्यात येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्यासोबत तो सोमवारी (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मनिष व अश्रिता यांचे कुटुंबीय व काही मोजके मित्रमंडळी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

अश्रिता शेट्टी आणि मनीष पांडे हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा होती. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

२६ वर्षांच्या अश्रिताने ‘इंद्रजीत’, ‘ओरु कन्नयम मुनू’, ‘कलावानिकलम’, ‘उदयम’, ‘एनएच ४’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेलीकेडा बोली’ या चित्रपटातून अश्रिताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

मनिष पांडे-अश्रिता शेट्टीआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा, मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोड्यांनी लग्न केलं. मनिष पांडे आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००९ साली बंगळुरूकडून खेळताना हैदराबादविरुद्ध मनिष पांडेने नाबाद ११४ रनची खेळी केली होती.