मनमर्जिया

प्रेम म्हणजे नक्की काय असते? तुझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणतो तेव्हा मनात नेमकी काय भावना असते? सर्वस्व देऊ  करणारे प्रेमच आपण कथाकादंबऱ्यांतून अनुभवले आहे. मात्र आजच्या काळात हे प्रेम अधिक बोलके झाले आहे. एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असूनही जोडीदार म्हणून त्याच्याकडून असलेल्या लैंगिक, भौतिक अपेक्षाही स्पष्ट करणारे हे प्रेम ‘मनमर्जिया’मध्ये खास कश्यप शैलीत थेट पण तितक्याच तरलतेने अंतर्मुख करत आपल्यासमोर येते.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची एक ठरावीक शैली आपल्या परिचयाची आहे. विषय कुठलाही असला तरी तो थेट, प्रसंगी अंगावर येईल अशा पद्धतीने मांडणारा अनुराग कश्यप ‘मनमर्जिया’ चित्रपटात पूर्णपणे वेगळा दिसतो. अर्थात हातचे काही न लपवता जे आहे ते रोखठोक पद्धतीनेच पडद्यावर येते. मात्र या चित्रपटात त्याच्या प्रेमाची परिभाषा अधिक हळुवार झाली आहे. अमृतसरच्या गल्लीत रोजच्या रोज घरांच्या छतावरून उडय़ा मारत रुमीच्या (तापसी पन्नू) घरात शिरणारा विकी (विकी कौशल) आणि त्यांच्यात रोज रंगणारे फ्यार.. इथे बॉलीवूडच्या नेहमीची प्रेमाची म्हणजे प्यारवाली गोष्ट ‘फ्यार’ होऊन भेटते. प्रेमाची झिंग डोक्यावर घेऊन स्वैरपणे, मुक्तपणे केलेले शारीर आणि मानसिक प्रेम. या प्रेमात दंग झालेल्या रुमी आणि विकीला पहिली ठेच लागते जेव्हा या प्रेमाची जबाबदारी घ्यायची वेळ येते. रुमी जिद्दी आहे, फटकळ बोलते, हॉकी खेळते, समोरच्याची पर्वा न करता मनात असेल ते बोलते. मात्र तरी ती हळवी आहे. रुमीची व्यक्तिरेखा खूप सुंदर पद्धतीने दिग्दर्शकाने रंगवली आहे. विकीकडून लैंगिक सुख मिळतेय, प्रेम मिळतेय, मात्र लग्नाची जबाबदारी स्वीकारायला तो तयार नाही हे लक्षात आल्यावर त्याला ते सुनवायला ती कमी करत नाही. आपले प्रेम जसे आहे तसे स्वीकारून पुढे जाण्याचीही तिची तयारी आहे. मात्र त्याने ते स्पष्टपणे कबूल करून एक तर जबाबदारी त्याने स्वत: घ्यावी किंवा आपल्यावर टाकावी असे म्हणून त्यातूनही मार्ग काढणारी रुमी एका क्षणी या सगळ्याच्या उलट, सरळसाध्या असलेल्या रॉबीच्या (अभिषेक बच्चन) येण्यानंतर हळूहळू बदलत जाते.

रॉबीची व्यक्तिरेखाही खूप वेगळ्या पद्धतीने लिहिली गेली आहे किंबहुना तितक्याच खरेपणाने समोर येते. व्यवसायाने बँकर असलेला रॉबी पहिल्यांदा रुमीचे छायाचित्र पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला आहे. तिच्या आणि विकीच्या प्रेमाबद्दल माहिती असतानाही जेव्हा रुमीच्या घरच्यांकडून लग्नाचा प्रस्ताव येतो तेव्हा ती संधी सोडायची नाही हेही तो मनात पक्के करतो. रुमीबरोबरचे त्याचे नाते तो ज्या पद्धतीने फुलवतो तो भागही खूप तरल पद्धतीने दिग्दर्शकाने रंगवला आहे. मुळात प्रेमकथा म्हणून मनमर्जिया वेगळा नाही. मात्र त्याची मांडणी करताना आजच्या काळाला अनुसरून प्रेम, लैंगिक सुख, आत्मिक समाधान या सगळ्याच भावनांचा गोफ खूप प्रामाणिक पद्धतीने दिग्दर्शकाने गुंफला आहे. त्यामुळे अनुराग कश्यपची मांडणीची एक छाप असूनही वेगळाच सुखद धक्का या चित्रपटातून मिळतो.

तिन्ही प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये असलेले कलाकार ही मोठी ताकद ठरली आहे. अभिषेक बच्चनचे या चित्रपटातील पुनरागमन त्याच्या चाहत्यांना सुखावणारे ठरले आहे. इतक्या काळानंतर चित्रपटात येताना यापेक्षा योग्य भूमिका नव्हती आणि त्याने रॉबीच्या व्यक्तिरेखेतून एकाच वेळी समंजसपणा, थोडी जिद्द, थोडा खेळ अशा वेगवेगळ्या छटा त्याने खूप प्रभावीपणे रंगवल्या आहेत. तापसी पन्नू प्रत्येक चित्रपटागणिक प्रभावी ठरते आहे. इतक्या सहजपणे ती रुमीच्या भूमिकेत शिरली आहे की त्याला तोड नाही. विकी कौशलचा विकीही तितकाच वेधक आहे. प्रेमातला वेडेपणा आणि शहाणपणा आल्यावरही जबाबदारी घेण्याची तयारी दाखवणारा विकी या सगळ्याच छटा त्याने नैसर्गिक पद्धतीने साकारल्या आहेत. इतक्या सुंदर प्रेमकथेसाठी संगीतकार अमित त्रिवेदीने संगीत दिलेल्या गाण्यांनी चारचाँद लावले आहेत.

खूप दिवसांनंतर मनमर्जिया सारखा एक वेगळा अनुभव तेही दिग्दर्शक अनुराग कश्यप शैलीतील चित्रपट प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला आहे.

* दिग्दर्शक- अनुराग कश्यप

* कलाकार- तापसी पन्नू, विकी कौशल, अभिषेक बच्चन.