बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने ‘जस्टिस फॉर सुशांत’ असं एक कॅम्पेनच सुरु केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे लवकरच ती ‘मन की बात’ नावाचा एक कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुशांतचे चाहते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अवश्य पाहा – “गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास काय?”; याचिका दाखल करणाऱ्यांवर कंगना संतापली

“न्याय आणि सत्यासाठी आपण मन की बात फॉर एस.एस.आर. हा कार्यक्रम आपण करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र येऊया.” अशा आशयाचं ट्विट करुन श्वेताने या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. शिवाय या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग नरेंद्र मोदींना पाठवावे अशी विनंती तिने सुशांतच्या चाहत्यांना केली आहे. हा कार्यक्रम येत्या १४ ऑक्टोंबरला होणार आहे.

अवश्य पाहा – पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस’मधून बाहेर

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आले. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.