अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘सोनचिडिया’ या चित्रपटात काम केलेले सहकलाकार मनोज वाजपेयी यांनी त्याच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली. “एका छोट्याशा शहरातून आलेल्या सुशांतने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं. पण तो मूळ कधीच विसरला नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. वयाच्या ३४ व्या वर्षांपर्यंत मी स्वत: काहीच कमावलं नव्हतं, असंदेखील ते म्हणाले.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “सर्वांच्या आयुष्यात चढउतार येतात. सुशांतच्या आयुष्यातही ते आले. मला नाही वाटत की मी त्याच्या इतका प्रतिभावान आणि हुशार आहे. मी वयाच्या ३४ व्या वर्षांपर्यंत काहीच कमावलं नव्हतं. त्याच्या तुलनेत माझं यश काहीच नाही. केवळ चांगला माणूस म्हणूनच नाही तर कमी वयात स्वबळावर इतकं यश संपादन करणारा माणूस मी सुशांतला ओळखतो.”

आणखी वाचा : कोणीच पाठिंबा देत नाही म्हणून करण जोहरने घेतला ‘हा’ निर्णय

“सुशांतच्या आत छोट्याशा शहरातला मुलगा दडला होता. इतकं काही कमावूनसुद्धा तो त्याचं मूळ कधीच विसरला नव्हता. त्याच्यात आणि माझ्यात हेच फक्त साम्य आहे,” असं ते पुढे म्हणाले.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर वाद सुरू झाला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यावर जोरदार टीक होत आहे.