एखादी मालिका अगदी सहजसुंदर अशी असते. त्यात एक सुरेख लय असते. ती पाहताना कधी एखादी सांगीतिका पाहतोय असं वाटू लागतं. तर कधी निखळ करमणुकीचा आनंद घेता येतो. कथानकाची फार ओढाताण नसते की कलाकारांना खूप काही पटवून द्यायचंय असं पण नसतं. तरीदेखील पाहताना प्रेक्षकाला गुंगून जायला होतं. ‘द माव्‍‌र्हलस मिसेस मीझल’ ही अगदी याच प्रकारची वेबसीरिज आहे. गोष्टीचा परिप्रेक्ष्य तुलनेने मर्यादित आहे, मात्र फार काही भाष्य वगैरे करायच्या भानगडीत न पडतादेखील बरंच काही सांगण्याची त्यात ताकद आहे.

१९५८ सालच्या न्यूयॉर्कमधील एका गृहिणीची ही गोष्ट आहे. मिरिअम म्हणजेच मीज आणि जोएल मीझेल यांचे उच्चभ्रू वर्गातील हे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत असतं, त्यांना दोन गोंडस मुलंदेखील आहेत. जोएलला कॅफेमधील स्टॅन्डअप आर्टिस्ट – कॉमेडियन व्हायचं असतं, पण तो वडिलांच्या भल्या मोठय़ा कारभाराचा सांभाळ करत असतो. आणि अधूमधून गॅस लाइट कॅ फेमध्ये कॉमेडियन म्हणून स्वत:ला सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो. यामध्ये मिरिअम त्याला पूर्णपणे मदत करत असते. कॅफेमध्ये त्याला संधी मिळावी इथपासून ते त्याच्यासाठी विनोद लिहिण्यापर्यंत. एका सायंकाळी जोएल पुरता उदास होतो, त्याला वाटू लागतं की आपण काही कॉमेडियन होणार नाही. त्याच तिरमिरित तो मिरिअमला सोडून घरातून निघून जातो. त्यातच त्याचे त्याच्या सेक्रेटरीशी संबंध जुळलेले असतात. मिरिअमसाठी हा मोठा धक्काच असतो. ना तिने यापूर्वी कधी काम केलेलं असतं, ना त्या दृष्टीने प्रयत्न. दोन मुलं पदरात, त्याच इमारतीत आई-वडिलांचं घर, पण एकटय़ाने संसार करणं म्हणजे काय याची तिने कल्पनादेखील केलेली नसते. नवरा सोडून गेल्याच्या रागात ती भरपूर वाईन ढोसते आणि थेट गॅस लाइट कॅ फेमध्ये जाऊन तेथील स्टेजवरून बडबडायला सुरू करते. तिचं हे सादरीकरण इतकं उत्स्फूर्त असतं की संपूर्ण कॅफे तिला दाद देऊ  लागतो. कॅ फेची मालकीण सुझन तिच्यातील कौशल्य ओळखते आणि तिला आणखीन संधी द्यायचं ठरवते. पण परवान्याशिवाय होणारं तिचं सादरीकरण, त्यातच तिच्या सादरीकरणातील आक्षेपार्ह भाग पाहून  तिला पोलीस पकडून नेतात. महिनाभरातच ती जोएलच्या घरातून तिच्या आईच्या घरी येते, पण रोज ती कॅ फेमध्ये जाऊ न स्वत:ला कॉमेडियन म्हणून प्रस्थापित करता येईल का हे पाहात राहते.

पहिल्या भागानंतर मालिकेचे  सारे भाग मिरिअमची ही धडपड मांडणारे आहेत. मिरिअमसुद्धा कुढत बसत नाही, की पेटून देखील उठत नाही. तिला तिच्यातील कौशल्याची जाणीव झालेली असते आणि ते कौशल्य तिला आजमावायचं असतं इतकंच. त्यातून पैसे तर मिळतीलच, पण मुळात तिला स्वत:लाच शोधायचे असते, असा हा प्रवास आहे. त्यात ना त्रागा आहे, ना कशाच्यातरी विरूद्धचं बंड.

अतिशय सुरेख अशी पटकथा, त्याला पूरक असा उत्तम अभिनय आणि अगदी चपखल असं दिग्दर्शन असंच या मालिकेचं वर्णन करावं लागेल. कथा उच्चभ्रू वर्गातील असली तरी ना त्यात बडेजाव आहे ना उगाच चौकोनी चाकोरीबद्धपणा. संपूर्ण मालिकेत कॅमेरा खूप बोलका आहे. मिरिअमच्या बरोबरीनेच कॅमेरादेखील खूप उत्स्फूर्तपणे नेमकं टिपण्याचं काम करतो. विशेषत: घरातील काही दृश्यं पाहण्यासारखी आहेत.

संपूर्ण मालिकेला एक सुरेल अशी लय आहे. ही लय मिरिअमच्या वावरण्यात दडली आहे.  मग ती कॅफेच्या स्टेजवर असो की लिफ्टमनच्या नोकरीसाठी मुलाखत देताना असो की सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात काम करताना असो. तिचा वावर हा अगदी सहज होत राहतो. त्यात कोणताही नाटकीपणा दिसत नाही.

संपूर्ण मालिकेत अनेक प्रसंग इतक्या बेमालूमपणे पेरले आहेत की ठणकावून सांगून पण जाणीव झाली नसती अशा गोष्टी दिग्दर्शक त्यातून साधून नेतो. उच्चभ्रू वर्गातील वागणं, त्यांच्या कुचाळक्या, प्रतिष्ठेची जपणूक, कॉमेडियनवर असणारी बंधनं, कायदा व्यवस्थेतील त्रुटी, सर्वसामान्य नागरिकांचे रोजचं जगणं, छोटय़ा गोष्टीत आनंद शोधणं, स्त्रीचं पुरुषावरचं अवलंबित्व अशा अनेक बाबी दिग्दर्शक सहजपणे मांडतो. आणि त्या त्या वेळी प्रेक्षकांना ते  अगदी सहजपणे जाणवतं हे सर्वात महत्त्वाचे.

‘माव्‍‌र्हलस मिसेस मीझल’ ही जरी १९५८ सालची गोष्ट असली तरी आता पाहतानादेखी ती ताजी वाटते ती या सर्व कारणांमुळे. मुळात त्यात स्मरणरंजनात हरवून जाण्याचा आव नाही. त्या काळात घडलेली एक कथा कशी असू शकेल याचं हे साधंसोपं सादरीकरण आहे. अमेझॉनने या मालिकेचा पहिला सीझन घेतल्यानंतर दोन सीझनचे हक्कदेखील घेतले आहेत. मागच्या वर्षांच्या अखेरीस पहिला सीझन प्रदर्शित झाला. अजून दोन सीझन येणार आहेत. तेदेखील पहिल्या सीझनप्रमाणेच माव्‍‌र्हलस असतील यात शंका नाही.

द माव्‍‌र्हलस मिसेस मीझेल – सीझन पहिला

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन