काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकने साखरपुडा झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ती बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न बंधनात अडकली. मानसीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मानसी प्रदीपच्या गावी फरीदाबादला गेली होती. आता ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत उखाणा घेतला आहे.

मानसीने लग्नातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने उखाणा घेतला आहे. ‘मंदिरात वाहते फुल आणि पान, प्रदीप रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान’ असा उखाणा मानसीने फोटो शेअर करत घेतला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे.

Video: मानसी नाईकच्या आईने घेतला भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर रंगली चर्चा

यापूर्वी मानसीच्या आईने उखाणा घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. खुद्द मानसीने आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केले.