PVR सिनेमागृहांमध्ये मंटो हा सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या काही प्रेक्षकांच्या पदरी निराशाच पडली. कारण मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अहमदाबाद, दिल्ली या ठिकाणी PVR मल्टिप्लेक्समध्ये गेलेल्या प्रेक्षकांना मंटोचे शो पाहता आले नाहीत. टेक्निकल ग्लिच (तांत्रिक अडचण) असल्याचे सांगत हे शो रद्द करण्यात आले. त्यामुळे सआदत हसन मंटोच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा अनेकांना पाहता आला नाही.

या सिनेमात सआदत हसन मंटो यांच्या लेखनावर भाष्य करण्यात आले आहे. फाळणीच्या आधी आणि नंतरच्या जखमा आणि त्यातून त्यांनी सहन केलेली वेदना त्यांनी मांडलेले विचार हे सगळे या सिनेमात मांडण्यात आले आहे. सआदत सहन मंटोची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. अभिनेत्री नंदिता दास लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र त्याचे शो रद्द झाले त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी हा सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना तो पाहता आला नाही. याबाबत नंदित दासनेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

PVR मल्टिप्लेक्समध्ये जे शो रद्द झाले त्यामुळे मी खूप नाराज झाले आहे. माझी सहा वर्षांची मेहनत आणि त्यामागे असलेली माझ्या टीमचे कष्ट सगळे वाया गेले असे वाटले. दुपारपर्यंत सगळे व्यवस्थित होईल असे आश्वासन मला Viacom18movies ने दिले आहे. मंटोचे शो कृपा करून थांबवू नका अशा आशयाचे ट्विट नंदिता दासने केले आहे. PVR नेही सगळे सुरळीत होईल असे आश्वासन दिले. त्यानंतर PVR ने सगळे शो व्यवस्थित सुरु असल्याचे ट्विट केले.