जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. त्यानंतर अनेक वेळा ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावर मानुषीने कायम मौन बाळगणं पसंत केलं. परंतु आता मानुषी खरंच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लवकरच ती अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

मानुषी अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा ऐतिहासिक बायोपिक चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित करणार आहेत. मानुषीने हा चित्रपट साइन केला असून यात ती ‘संयोगिता ’ची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट यशराज प्रोडक्शनअंतर्गत तयार होणाऱ्या अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांच्या प्रेमकथेतील काही पैलू उलगडण्यात येणार आहेत.

“यशराज फिल्म्सअंतर्गत काम करण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर हे माझं नशीबच आहे. यशराज हे कलाविश्वातील मोठं नाव असून त्यांच्यासोबत काम करण्याची कोणाची इच्छा नसेल? राजकुमारी संयोगिता यांची भूमिका साकरणं एक मोठी जबाबदारी आहे. कोणतीही ऐतिहासिक भूमिका करणं ही जबाबदारीची गोष्ट असते. त्यामुळेच मी भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे”, असं मानुषीने सांगितलं.

वाचा : “रेप सीन करुन दाखव”; अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनदरम्यानचा धक्कादायक प्रसंग

दरम्यान, बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट असल्याने मानुषी या भूमिकेची जोरदार तयारी करत आहे. अनेक अभिनय आणि नृत्य कार्यशाळांमध्ये ती सहभाग घेत आहे. त्या त्या काळाचा योग्य अभ्यास करण्यासाठी तिने वाचन सुरु केलं आहे.