मनवा नाईक – response.lokprabha@expressindia.com
प्राण्यामुळे लहान मुलांचं भावविश्व अतिशय समृद्ध होत असतं. त्यातून निर्माण होणाऱ्या प्राणीप्रेमाचा पुढच्या सगळ्या आयुष्यावर अतिशय सकारात्मक परिणाम होतो.

मी जन्माला आले, तेव्हा आमच्या घरात दोन कुत्रे होते. लिओ आणि शंभू.  लिओ, सिडनीसिल्की, वय १६ आणि शंभू बॉक्सर, आठ वर्षांचा. त्यामुळे घरात जशी माणसं असतात तसेच प्राणीही असतात, हा माझा समज झाला आणि अगदी जन्मल्यापासून मी नकळत प्राण्यांवर प्रेम करायला शिकले. अनेक प्राणी माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मला वेगळाच आनंद आणि प्रेम दिलं. प्रेम करायला शिकवलं. नकळत कर्तव्यनिष्ठा शिकवली.

त्या काळात रस्त्यावर अनेकदा हत्ती, घोडे, अस्वलं हे प्राणी दिसत. माझे वडील जादू असल्यासारखं मला विचारत ‘तुला हत्ती पाहायचाय ना.. हा बघ’. रस्त्यावर चालणारा तो मोठा प्राणी मला आश्चर्यचकित करायचा आणि मग एके दिवशी माझं ठरलं. मला हत्ती हवा होता शाळेत जायला. मी खूप रडले, पण घरचे नाही म्हणाले. ‘तुला शाळेत सोडणं हे हत्तीचं काम नाही. ज्याची जी डय़ुटी आहे, त्याने ती करावी,’ आणि हत्ती पाळायचा राहिला.. पण प्राणिप्रेम मात्र वाढलं.

आमच्या बागेत तीन पेरूची आणि एक भलं मोठं फणसाचं झाड आहे. दरवर्षी ऋतू बदलला आणि पेरूचं झाड फळांनी भरलं, की पोपटांचा थवा यायचा. मग छोटीशी मी आणि अनेक पोपट असे आम्ही पिकलेले पेरू तोडायचो आणि खायचो. अजूनही पोपटाचा थवा येतो.

दोन वर्षांपूर्वी अचानक आम्हाला ‘टक.. टक’ असा आवाज ऐकायला येऊ लागला. काही कळेना, कोण दार ठोठावतंय. घरभर शोधाशोध झाली, पण काही कळेचना. एक महिना हा आवाज येत होता. भुताटकी म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण भुताटकीवर माझा विश्वास नाही. पण एका महिन्याने फणसाच्या झाडावर दिसला एक सुंदर पिवळसर हिरवा पक्षी. लाल चोच आणि रेखीव डोळे. कॉपरस्मिथ बाब्रेट, मराठीत ‘तांबट’. क्षणात दिसायचा, क्षणात गायब. त्याने त्या फणसाच्या झाडाच्या फांदीवर महिनाभर ठोकून-ठोकून एक भोक म्हणजेच स्वतसाठी घर तयार केलं होतं. तो माझ्यासाठी ‘युरेका’ क्षण होता, आवाजाचं कोडं सुटलेलं होतं. त्याने आपलं कर्तव्य मेहनतीने पार पाडून, आपल्या पिल्लांसाठी एक घर तयार केलं होतं. काही दिवसांत तिथे अजून एक तसाच पक्षी आला. त्या दोघांचं होतं ते घरटं. ते आळीपाळीने त्यांच्या त्या घरटय़ात राहत आणि पिल्लांची काळजी घेत. एक घरी आणि एक बाहेर असा त्यांचा कारभार होता. माझं मन त्या पक्ष्यांमध्ये रमलं आणि ते माझे पाळीव पक्षी झाले.

पण ऋतू बदलला आणि घर मागे सोडून ते तिघंही उडून गेले कायमचे. मी पुढच्या ऋतूमध्ये वाट पहिली. पण ते आलेच नाहीत.  मग ती फांदीही सुकून पडली. मला खूप वाईट वाटलं, पण आयुष्य चालू राहतं.. हे काही दिवसांचे सोबती आनंद देऊन गेले. पक्ष्यांचा धर्म मी शिकले. मला पक्षी निरीक्षणाची गोडी लागली आणि मी शोधू लागले असे इतर नवे नवे अतिथी.

ख्रिसमसच्या दिवशी सान्ताक्लॉजसारखं आलं ते एक पांढरं घुबड. मग काही दिवसांनी आली बुलबुल. पण हल्ली रोज येतो तो पिवळा ओरॅकल. दर ऋतूत येणाऱ्या या नवनव्या पक्ष्यांची मी आतुरतेने वाट पाहते. निसर्गाचे नियम आणि बदल यांचं अचूक अनुसरण करणारे हे पक्षी मला वेगळाच आनंद देतात.

लग्नानंतर मी माझं घर सजवलं ते वेगवेगळ्या अ‍ॅनिमल मोटिफ्सनी. मांजरीच्या डिझाइनच्या उशा, जिराफाची काठी, हत्तीच्या आकाराचे हुक्स. पण कुठेच फर, वुल, आयवरी नाही. प्राण्याला मारून प्राणिप्रेम नाही. प्राण्याला जगवून प्राणिप्रेम.

मी आफ्रिकेच्या जंगलात फिरायला गेले होते. तेव्हा तिथे बिग फाइव्ह पाहिले. त्या कपामा गेम अभयारण्यामधल्या वनसंरक्षकाला सगळं माहीत होतं. मोठय़ा जंगलात त्याने ते बिग फाइव्ह बरोबर शोधले आणि आम्हाला दाखवले. अ‍ॅनिमल चेनमध्ये तरस बिबटय़ापेक्षा उच्च असतो, हे मला तेव्हा कळलं. आम्ही रात्री १० फुटांच्या अंतरावरच्या एका झाडावर बिबटय़ा पाहिला. तो अंगावर उडी मारेल असं मला वाटलं. पण तो वनसंरक्षक म्हणाला की त्याच्या तोंडात त्याचं अन्न आहे. त्याचं पोट भरलंय तोवर तो हल्ला करणार नाही. किती शिकण्यासारखं आहे यातून..

माझी एक गमतीशीर थिअरी आहे, की प्रत्येक माणसाच्या आणि प्राण्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा सारखेपणा असतो. वागणुकीत नसला, तरी दिसण्यात असतो. माझ्या या थिअरीवर माझ्या मत्रिणी म्हणतात की मी आमचा बॉक्सर कुत्रा ‘कनोजी’सारखी दिसते. कनोजी माझा वीक पॉइंट, एक अतिशय खेळकर, प्रेमळ आणि द बेस्ट िथग दॅट एव्हर हॅप्पण्ड टु मी..

गौतम जोगळेकरचा फोन आला की ‘पुण्यात एक पांढरा कनोजी आहे. फार मस्तीखोर..ज्यांच्याकडे तो आहे त्यांना सांभाळायला जमत नाहीये.. तुम्हाला सवय आहे. तुम्ही त्याला न्या’. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि कनोजी आला २००० साली आमच्या घरी. बॉक्सर सामान्यत ब्राऊन असतात. पण हा एकदम पांढरा शुभ्र. गुलाबी तोंड, दोन इंचांची शेपटी. ती तो जोरजोरात हलवायचा.

आम्ही एकदा कर्नाटकात गेलो होतो त्याला घेऊन. वाटेत चहा-पाण्याला थांबलो. गाडीच्या काचा खाली होत्या. कनोजीला रस्त्यात एक गाढव दिसलं. याआधी कानोजीची खऱ्या गाढवाशी कधी गाठ पडली नव्हती.  तो चकित होऊन त्या गाढवाच्या मागे धावू लागला आणि आम्ही सगळे त्याच्या मागे. त्या दिवशी हायवेवर एक गाढव त्याच्यामागे एक पांढर कुत्रं आणि त्याच्यामागे चार वेडे हा देखावा अविस्मरणीय होता. गाढव शेवटी गाढवच, पण आमचं काय!

कनोजीला आम्ही रोज नवी नवी नावं द्यायचो. कधी कानोबी, काकू, स्ट्रोबेरू, रॅबिट. मग पुढे वेगवेगळी नावं. एकदा तो साबुदाणा होता. कधी तो हत्ती असे, कधी तो सान्ताक्लॉज. माझी सगळी हौस मी कनोजीवर भागवली.

मी घरी एकटी असले की कनोजी सतत माझ्याबरोबर असे. त्याने मला कधीच एकटं वाटू दिलं नाही. तो माझ्याबरोबर झोपायचा आणि सकाळी फिरायला जायचा. मग परत दहाच्या सुमारास मी उठले नसेन तर उठवायला यायचा. अजूनही माझ्या कानात त्याच्या पावलांचा आवाज घुमतो. १५ मार्च २०११ ला आमचा १३ वर्षांचा कनोजी गेला आणि आजवर मी त्या दुखातून सावरले नाहीये. त्या वर्षी माझ्या वाढदिवसाला कनोजीच्या पंज्याचा टॅटू मी माझ्या खांद्यावर केला. कारण असं म्हणतात की टॅटू गोज विथ यू टू युवर ग्रेव्ह.. निष्ठा, निखळ आनंद आणि नि:स्वार्थी प्रेम कनोजीने शिकवलं.

कनोजी, लिओ, शंभू, स्नूपी हे आमचे कुत्रे, बागेतले पक्षी, रस्त्यावरचे कधी कधी दिसणारे प्राणी तर रानावनातले ते मोठे प्राणी हे सगळे खरे. ते त्यांचे स्वभाव कायम ठेवतात. निसर्गाप्रमाणे वागतात. प्राणिधर्माला जपतात आणि त्यांची परिसंस्था सुरू ठेवतात. ते चुकत नाहीत. ते खोटे नाहीत. ते अंदाज करता येणार नाही असं बेभरवशाचं वागत नाहीत. तेच काय ते खरे.

प्राण्यांवर प्रेम करा, प्राण्यांना मारू नका. खरा स्वभाव आणि निखळ आनंद प्राणीच देतात म्हणून तर ते माणसाचे सच्चे दोस्त असतात.
सौजन्य – लोकप्रभा