जुलै महिन्यात छोटय़ा पडद्यावर नवीन मालिकांची मोठी लाट येत आहे. बहुतेक सर्वच वाहिन्यांवर नवीन मालिकांची खैरात होत आहे.  जुलै महिन्यातील सगळ्यात मोठे आकर्षण आहे अमिताभ बच्चन यांच्या ‘युद्ध’ या मालिकेचे. या मालिकेत अमिताभ यांच्या सोबत सारिका, के के मेनन, नवाजुद्दिन सिद्दिकी अशी तगदी स्टारकास्ट पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर अवतरणार आहे. या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. १० जुलैपासून सोनी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार असून ‘बडे अच्छे लगते है’ची जागा ती घेणार आहे. ‘बडे अच्छे लगते है’मधील राम कपूर – साक्षी तन्वर या जोडीमुळे मालिका सुरवातीच्या काळात लोकप्रिय झाली होती. पण नंतर राम कपूर चित्रपटांमध्ये व्यस्त झाल्याने मालिकेकडे दुर्लक्ष झाले आणि मालिकेच्या लोकप्रियतेवर त्याचा परिणाम दिसू लागला होता.

 ‘कलर्स’वर  ६ जुलैपासून अनुपम खेर यांचा ‘कुछ भी हो सकता है’ हा कार्यक्रम सुरू झाला असून याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर २१ जुलैपासून संध्याकाळी ७ वाजता ‘शास्त्री सिस्टर्स’ ही गावातून शहराकडे येणाऱ्या चार बहिणींची कथा सांगणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 ‘लाईफ ओके’वर ‘लौट आओ त्रिशा’ ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘भाग्यश्री’चे हे छोटय़ा पडद्यावरील पदार्पण असल्याने या मालिकेकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

सब टिव्हीवर सुद्धा ‘तू मेरे अगल बगल है’ हा कार्यक्रम ७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात आलोकनाथ आणि सुप्रिया पाठक यांच्या विनोदांची जुगलबंदी पहायला मिळेल. त्यासाठी मात्र कोणत्याही मालिकेला निरोप घ्यावा लागला नसून फक्त ‘एफ आय आर’ मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

‘झी समूहाने’ २३ जूनपासून ‘झी जिंदगी’ या वाहिनीला सुरुवात केली होती. तिलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जुलैपासून या वाहिनीवरही ‘नूरपूर की रानी’, ‘मात’ या नवीन मालिकांचा समावेश होणार आहे.
’ मराठीतही ‘ई टिव्ही’वरील ‘सुंदर माझे घर’ या मालिकेची जागा ११ जुलैपासून चिन्मय मांडलेकर अभिनित ‘तूच माझा सांगाती’ ही संत तुकारामांच्या जीवनावर आधारित मालिका घेणार आहे.

ऑगस्ट महिनाही नवीन मालिकांच्या आगमनाचा.
ऑगस्ट महिन्यापासून ‘उडान’ या नवीन मालिकेची सुरुवात होणार असून या निमित्ताने आतापर्यंतची लोकप्रिय मालिका ‘मधुबाला’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, असे सांगितले जात आहे. तसेच सब वाहिनीवरील ‘लापतागंज फिर एक बार’ ही मालिकाही निरोप घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्याजागी प्रशांत दामले-कविता लाड यांची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. स्टार प्लसवरील ‘महाभारत’सुद्धा १५ ऑगस्टला संपणार आहे. तसेच स्टार प्रवाह वरील ‘ढाबळ’सुद्धा जुलै-ऑगस्ट पर्यंत संपणार आहे आणि त्याजागी एका नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे, पण त्याची घोषणा अद्यापी वाहिनीतर्फे करण्यात आलेली नाही.