हिंदी चित्रपटांचे पुरस्कार सोहळे हा नेहमीच लोकांच्या आवडीचा आणि त्यामुळे वाहिन्यांच्या चढत्या टीआरपीचा विषय राहिला आहे. या पुरस्कार सोहळ्यांच्या जोरावर शाहरूख खान, शाहीद कपूरसारख्या अभिनेत्यांपासून ते विनोदवीर कपिल शर्मापर्यंत अनेकांनी सूत्रसंचालक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदीच्या या लखलखत्या सोहळ्यांमध्ये एरव्ही प्रादेशिक चित्रपटांना जागा नसते. मात्र यंदा ‘झी सिने अ‍ॅवॉर्र्ड्स’ने आपले स्वरुप बदलले असून या सोहळ्यात प्रादेशिक चित्रपटांचीही दखल घेतली गेली आहे. यंदाच्या या ‘झी सिने अ‍ॅवॉर्ड्स’ सोहळ्यात मराठमोळ्या कलाकारांनीही आपला ठसा उमटवला आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या घोषवाक्यानुसार ‘झील’ समूहाने आपल्या विविध भाषिक वाहिन्यांनाही मुख्य प्रवाहात एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘झी सिने अ‍ॅवॉर्ड्स’ हा त्यांचा मानाचा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच प्रादेशिक चित्रपटांची दखल घेतली गेली असून हिंदी ‘झी’, ‘झी सिनेमा’ या वाहिन्यांबरोबरच ‘झी मराठी’, ‘झी बांग्ला’ सारख्या प्रादेशिक वाहिन्यांवरही आपल्या भाषेत हा सोहळा अनुभवता येणार आहे. या सोहळ्यात पहिल्यांदाच मराठी चित्रपटांना पुरस्कार दिले जाणार असून त्यानिमित्ताने मराठीतील दोन तारकांचा जबरदस्त कार्यक्रम हे या सोहळ्याचे आकर्षण ठरले आहे. ‘वाजले की बारा’ म्हणत थिरकणारी अमृता खानविलकर आणि ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ सारख्या चित्रपटांमधून आपला ठसा उमटवलेल्या मृण्मयी देशपांडे या दोन मराठी तारकांना या सोहळ्यात नृत्य करण्याची संधी मिळाली.

तर ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत राज्यभर विनोदाची लाट पसरवणाऱ्या डॉ. निलेश साबळे यांनी या सोहळ्यातील मराठी पुरस्कारांचे सूत्रसंचालन केले आहे. मराठी कलाकारांचा या सोहळ्यावरचा करिश्मा प्रेक्षकांना ‘झील समूहा’च्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून ५ मार्चला या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.