नाटक हा कलाविश्वाचा गाभा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे नाटक, रंगमंच याला विशेष महत्त्व आहे. आजपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरची सुरुवातही रंगमंचावरुनच केली आहे. रंगमंचावरुन अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारे अनेक सेलिब्रिटी आज चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज या विविध माध्यमांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवत आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. आतापर्यंत अनेक नाटक, चित्रपट करणाऱ्या या अभिनेत्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत नाटकाविषयी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे वयाच्या १६ वर्षांपर्यंत नाटक म्हणजे काय हेदेखील माहित नसल्याचं त्याने सांगितलं.

अलिकडेच अभिनेता जितेंद्र जोशीने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या करिअरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. चित्रपट, नाटक, वेबसीरिज आणि मालिका यात काम करण्याचं अनुभव कथन केलं. मात्र जितेंद्रच्या अभिनयाची खरी सुरुवात नाटकापासून झाली आहे.

“लहान वयात असताना नाटक म्हणजे काय हेदेखील मला माहित नव्हतं.परंतु कळत्या वयात प्रसाद ओक, सुबोध भावे, लोकेश गुप्ते यांची नाटकं पाहिली. ती पाहिल्यानंतर आपणही हे करुन पाहायला हवं, या विचाराने मी पुण्यातील सृजन या नाट्संस्थेत गेलो. तेथे अनेक दिग्गजांची भेट झाली आणि अनेक नाटकाचे प्रयोग केले, अनेक नाटकाचे दौरे केले. त्यानंतर इथून खऱ्या अर्थाने माझ्या नाटकाची सुरुवात झाली”, असं जितेंद्र जोशीने सांगितलं.

दरम्यान, नाटकापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या जितेंद्रने आज कलाविश्वात अढळ स्थान निर्माण केलं आहे. मालिका, चित्रपटांनंतर त्याने त्याचा मोर्चा वेबसीरिजकडे वळविला आहे. अलिकडेच त्याची बेताल ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीली आहे.