News Flash

‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा हा मराठी अभिनेता कोण ?

बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपट धुमाकूळ घालत आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल मुख्य भूमिकेत असताना दुसरकीडे मराठी कलाकारांची फौज आहे. देवदत्त नागे, अजिंक्य देव, शशांक शेंडे, शरद केळकर यांनीदेखील चित्रपटात महत्त्वाची पात्रं साकारली आहेत. या सर्व प्रसिद्ध कलाकारांसोबत अजून एक मराठी कलाकार चित्रपटात झळकला आहे ज्याचं नाव सध्या चर्चेत आहे. हा अभिनेता आहे कैलास वाघमारे.

कैलास वाघमारेने चित्रपटात ‘चुलत्या’ ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका छोटी असली तरी कैलास वाघमारेने ती चोख निभावली आहे. यामुळेच कलाकारांच्या इतक्या मोठ्या गर्दीतही तो लक्षात राहतो. तान्हाजी चित्रपटामुळे कैलास वाघमारे प्रसिद्धीस आला असला तरी याआधीही त्याने बरंच काम केलं आहे. सांगायचंच झालं तर ‘शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकात त्याने कट्टर मावळ्याची भूमिका निभावली होती.

कैलास वाघमारेचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. कैलासने नाट्यशास्त्रातून पदवी संपादन केली आहे. ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका साकारली होती. मात्र तान्हाजी चित्रपटातील भूमिका त्याच्या करिअरला कलाटणी देणारी ठरत आहेत

अशी मिळाली भूमिका –
अजय जाधव नावाचा माझा मित्र आहे. ज्यांनी चित्रपटाचं कास्टिंग केलं आहे त्यांच्यासोबत तो काम करतो. एका खबऱ्याच्या भुमिकेसाठी मला बोलावलं होतं. तो छोटा रोल होता. नंतर मी दिग्दर्शक ओम राऊत यांना जाऊन भेटलो. ते मला नेमकी काय भूमिका आहे हे समजावून सांगणार होते. त्यांनी माझ्याशी अशाच गप्पा मारण्यास सुरु केल्या. यानंतर मी माझ्या कामाबद्दल सांगू लागलो. मी केलेल्या कामाची माहिती दिल्यानंतर ते खूश झाले. तुला इतकी छोटी भूमिका नको, मोठी भूमिका दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्यांना लगेचच कास्टिंग डायरेक्टरला बोलावून घेतलं. त्यांनी मला ऑफिसला नेलं आणि चुलत्याच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतलं. दुसऱ्या दिवशी मला प्रोडक्शन हाऊसकडून फोन आला. तुमचं काम १०-१२ दिवसांचं नसून २६ दिवसांचं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मला खूप आनंद झाला.

“माझं काम लोकांना इतकं आवडेल असं वाटलं नव्हतं”
चित्रपटातील माझं पात्र लोकांना इतकं आवडेल असं वाटलं नव्हतं. कारण ते पात्र खूप छोटं आहे. दोन ते तीन सीनच आहेत. चित्रपटामुळे आयुष्यात नेमका काय बदल झाला आहे हे नेमकं सांगू शकत नाही. ते एका चौकटीत बसू शकत नाही. पण खूप काही बददलं आहे. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो बदलला आहे. लोक आधी हा गावाकडून आलेला कलाकार आहे असं पाहायचे. कास्टिंग डायरेक्टरही मला आता तुम्ही मराठी अभिनेता नाही तर अभिनेता झाला आहात असं सांगत होते. माझ्यासोबत खूप काहीतरी वेगळं घडतंय आणि ते सकारात्मक आहे. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं असं काहीतरी आहे.

चित्रपटातील मराठी कलाकारांनीही केलं कौतुक
अजिंक्य देव यांच्यासोबत माझे सीन असल्याने त्यांना माझं काम आवडलं होतं. त्यांनी कौतुकही केलं होतं. जुहूच्या एका चित्रपटगृहात शरद केळकर आले होते. त्यांची आणि माझी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही पहिली भेट होती. त्यांनी कडकडून मिठी मारली. त्यांना खूप आनंद झाला. मी आठ ते दहा वेळा चित्रपट पाहिला आहे. पण तू पडद्यावर आल्यानंतर जो रिस्पॉन्स येतो तो कमालीचा आहे असं त्यांनी सांगितलं. मराठीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांचे मला फोन आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 11:50 am

Web Title: marathi actor kailash waghmare bollywood film tanjhai unsung warrior ajay devgan sgy 87
Next Stories
1 Video : ”झुंड’ नहीं टीम कहिए..’; अमिताभ-नागराज मंजुळेंचा दमदार टीझर
2 ‘तान्हाजी’ची दहा दिवसांत बक्कळ कमाई; तिकिटबारीवर गर्दी
3 इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुशांतविषयी काही रंजक गोष्टी
Just Now!
X