काही वर्षांपूर्वी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. कमी कालावधीत ललितने अनेकांच्या मनावर राज्य केलं. तर, अनेकींच्या गळ्यातलं ताईत झाला. त्यामुळे सध्या लोकप्रियतेचं शिखर गाठलेला हा अभिनेता बऱ्याचदा रुपेरी पडद्यावरच पाहायला मिळतो. लवकरच ललितचा टर्री हा नव्या दमाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

ललितने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरकडे पाहिल्यानंतर एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातून बिनधास्त, बेधडक असलेल्या तरुणाईची गोष्ट उलगडणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

टर्री या आगामी चित्रपटातून एक नवा विषय हाताळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटाविषयी अद्याप कोणत्याही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव ऐकून अनेकांना प्रश्न पडले आहेत. ‘टर्री’ म्हणजे नेमकं काय? हा एकच प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

‘टर्री’ म्हणजे बेधडक. जबरदस्त ऊर्जा असलेला, सळसळत्या रक्ताचा तरुण, जो बेफिकीर, बेधडक आहे. काहीही करण्याची धमक असलेला, टेररबाज वृत्तीचा, वेळप्रसंगी समाजाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करण्याची ताकद अंगी असलेला एखादा डॅशिंग तरुण म्हणजे ‘टर्री’… विशेषत: ग्रामीण भागात अशाप्रकारच्या बोलीभाषेतील शब्दाचा वापर केला जातो. एखादा बेधडक तरुण दिसला की, त्याला ‘टर्रीबाज’ म्हटलं जातं. त्यामुळंच मराठीतील या धडाकेबाज ‘टर्री’ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रथमदर्शनीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा डॅशिंग स्टार ललित प्रभाकर ‘टर्री’ सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगानं ‘टर्री’ची निर्मिती केली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते आहेत. महेश रावसाहेब काळे यांनी आपल्या काहीशा रांगड्या शैलीत या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.