मराठी चित्रपटसृष्टीतला चतुरस्त्र अभिनेता म्हणून मंगेश देसाईकडे पाहिलं जातं. मंगेश देसाई कायमच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारा मंगेश लवकरच ‘झोलझाल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे सध्या त्याची चर्चा होत आहे. परंतु या चर्चांमध्ये त्याची एक वेगळीच चर्चा रंगतीये ती म्हणजे त्याने निश्चय केलेल्या बुर्ज खलिफाच्या उभारणीची.

‘झोलझाल’ या चित्रपटामध्ये मंगेश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो प्रेम दिक्षीत या बांधकाम व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. हा बिल्डर त्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी तो कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. विनोदी अंग असलेली ही खलनायकी भूमिका मंगेश या चित्रपटात साकारत आहेत. या चित्रपटातल्या प्रेम या बिल्डरला त्याचे एक स्वप्न पूर्ण करायचे असतं. दुबईत बांधण्यात आलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारची इमारत प्रेमला महाराष्ट्रात बांधायची आहे.

बुर्ज खलिफा एवढी मोठी इमारत बांधून नावलौकिक मिळवायचा अशी त्याची इच्छा असते. ही इमारत त्याला ज्या ठिकाणी बांधायची त्या ठिकाणी एक बंगला असल्याने त्याला तो बंगला कोणत्याही किंमतीवर मिळवायचा आहे. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो. यासाठी तो साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करायलाही मागेपुढे बघत नाही. हा प्रेम त्याचे स्वप्न पूर्ण करतो का? तो बंगला विकत घेतो की नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘झोलझाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.

वाचा : श्वेता तिवारीची Bold & Beautiful लेक

 मंगेश देसाई म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. एकाच प्रकारच्या भूमिकेलाही अनेक छटा असू शकतात हे त्यांनी त्यांच्याच दोन भूमिकांमधून सिद्ध केले आहे. ‘जजमेंट’ चित्रपटाला अस्सल क्रूर खलनायक ते ‘झोलझाल’ चित्रपटातला विनोदी अंग असलेला खलनायक. या दोन खलनायकीच तरीही परस्परविरोधी भूमिका आहेत. अभिनयात मुरलेल्या मंगेश देसाई सारख्या कलाकारांसाठी अशा भूमिका म्हणजे निव्वळ पर्वणीच असते.

मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले आहे. अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता तर शिवाजी डावखर यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे. तर नजीब खान यांनी छायाचित्रणकार म्हणून काम पहिले आहे. येत्या १ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.