गीत रामायणाच्या सांगीतिक प्रतिभेचा ठेवा म्हणजे प्रत्येकाच्या मर्मबंधातील ठेव. मराठी मनाच्या भावविश्वाचा मोठा भाग ‘गीत रामायणा’ने व्यापला आहे. गीतकार ग.दि माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेल्या या कलाकृतीबद्दल ‘कृतज्ञता’ हा एकच भाव व्यापून उरतो. या कृतज्ञतेपोटीच ‘रमेश देव प्रोडक्शन प्रा.लि.’ व ‘सुबक’ यांनी पुढाकार घेत ‘नृत्य-सजीव गीत रामायण’या कार्यक्रमाच्या निर्मीतीचं शिवधनुष्य उचललं आहे. येत्या ३० सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी ‘नृत्य-सजीव गीत रामायणाचा नेत्रदिपक सोहळा मुंबईत रंगणार आहे. अनेक दिग्गज कलाकार, गायक व वादकांना घेऊन तसेच गीत–नृत्याचा अनोखा संगम साधत ‘नृत्य-सजीव गीत रामायणा’चा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर शिल्पाने तो व्हिडिओ केला डिलीट

मराठी भाषेतील वाङमयीन व सांगीतिक कलाकृतींमध्ये ‘गीत रामायणा’चे स्थान अग्रस्थानी आहे. या महाकाव्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे भाग्य आम्हाला मिळाले याबद्दल समाधान व्यक्त करत ‘नृत्य-सजीव गीत रामायण’आजच्या पिढीला निश्चितच भावेल, असा विश्वास दिग्दर्शक अभिनय देव व अभिनेता अजिंक्य देव याने व्यक्त केला. मराठीतील हे सांस्कृतिक वैभव रसिकांसमोर आले पाहिजे या उद्देशाने या अनोख्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी आवर्जून पुढाकार घेतल्याचे सुनील बर्वे याने सांगितले. रामायणातील प्रमुख पात्रांचे स्वभाव विशेष, त्यांचे परस्परसंबंध, राग, लोभ, हर्ष, खेद या सर्व भावना या गीतांतून प्रकट होतात. या काव्यानुभवाची स्वत:ची एक चित्रभाषा देखील आहे. ती आजच्या पिढीला कळावी यासाठी ‘नृत्य-सजीव गीत रामायण’खूप महत्त्वाचं असल्याचं मत नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी व्यक्त केलं. या अनोख्या संकल्पनेचे कौतुक करत ‘नृत्य-सजीव गीत रामायणा’च्या यशाकरिता ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘नृत्य-सजीव गीत रामायणाच्या सादरीकरणाचे वेगळेपण म्हणजे हा नृत्याविष्कार ध्वनिमुद्रित ‘गीत रामायणा’वर नसून, संगीत क्षेत्रातील मातब्बर कलाकार ते जिवंत, प्रत्यक्ष सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरेचे आहे. सोनिया परचुरे आणि ‘शरयू नृत्य कलामंदिर’चे शिष्य ‘कथक’ या शास्त्रीय नृत्यप्रकाराच्या आधारे ते सादर करतील. अजित परब, हृषीकेश रानडे, विभावरी आपटे, शमिका भिडे हे यासाठी गाणार असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहे. अतुल परचुरे या सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रधार करणार.
आपल्या संस्कृतीत विजयादशमीचं एक वेगळं महत्त्व आहे. येत्या विजयादशमीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी शनिवार ३० सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वा. षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहामध्ये ‘नृत्य-सजीव गीत रामायणा’चा नेत्रदीपक सोहळा रंगणार आहे.