कॉलेज आठवणींचा कोलाज : प्रसाद ओक, अभिनेता

मी बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे या कॉलेजमध्ये माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. मला कॉलेजने काय दिलं? तर मला कॉलेजने सहचारिणी दिली. मी आणि माझी बायको आम्ही दोघेही याच कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटलो. कॉलेजचा कट्टा म्हणाल तर आमच्या दीप्ती हॉलच्या पायऱ्या. हा आमच्यासाठी कट्टा होता. दीप्ती हॉलमध्ये मी पडीक असायचो. नाटकाच्या तालमी, अभ्यास, मजामस्ती सगळं काही दीप्ती हॉलमध्येच!

माझ्या कॉलेज आठवणींचा कोलाज हा अतिशय रंगीबेरंगी आहे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी मी जरा उदास आणि चिंतेत होतो. मी ज्या शाळेतून पास झालो ती फक्त मुलांचीच शाळा होती. त्यामुळे आता कॉलेजमध्ये मुलीही असणार त्यांच्याशीसुद्धा मैत्री करावी लागणार. याची चिंता होती. पहिल्या दिवशी फार मित्रही झाले नाहीत. अकरावीचं वर्ष जरा ठीकठाकच गेलं. बऱ्याच मुलांजवळ बाइक होती. मी मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने सायकलवरून जायचो. बृहन्महाराष्ट्र कॉलेजची वास्तू ही माझ्यासाठी अतिशय भाग्यशाली आहे, असं मी म्हणेन. कारण कॉलेजमध्ये पाऊल टाकल्या दिवसापासून माझ्या नशिबातल्या सर्व सकारात्मक गोष्टी मला कॉलेजच्या वास्तूतच मिळाल्या. कॉलेज दिवसांमध्ये अनेक तरुण भविष्याच्या दृष्टीने बरेच निर्णय घेतात. तसा मीसुद्धा घेतला. याच कॉलेजमध्ये शिकत असताना मला पुरतं कळून चुकलं की, मी केवळ कलाक्षेत्रातच दिग्दर्शक, गायक वा अभिनेता म्हणून वावरू शकतो. मी माझं उत्तम भविष्य घडवू शकतो. उद्योग वा नोकरी करण्यासाठी मी घडलेलो नाही आणि माझा हा निर्णय योग्यच होता, याची प्रचीती मला आता येते. अनेक तरुणांचे निर्णय या वयात चुकतातही, चुकीच्या ठिकाणी पाय घसरतोही पण माझा घसरला नाही यात समाधान आहे.

मी कॉलेजमध्ये पाच वर्षे फक्त नाटकच केलं. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते ‘सेंड ऑफ’पर्यंत पाच वर्षे मला या कॉलेजने घडवलं. नवनवीन अनुभव दिले. पाच वर्षांत मी ८० वैयक्तिक बक्षिसं पटकावली.

‘सेंड ऑफ’च्या दिवशी कॉलेज सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांला बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सकडून दिला जाणारा बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट म्हणून ‘सरस्वती प्रसाद’ पुरस्कार दिला जातो. जो त्या वर्षी मला आणि अजून एका विद्यार्थ्यांला विभागून दिला. हा पुरस्कार घेत असतानासुद्धा मला खूप मोठा संदेश मिळाला तो असा, विभागून पुरस्कार देण्याचा मी आणि माझ्या मित्रांनी निषेध केला. माझं नाव घोषित केल्यानंतरसुद्धा मी हा पुरस्कार घ्यायला रंगमंचावर गेलो नाही. शेवटी पाहुणे म्हणून आलेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी खडय़ा आवाजाने माझं नाव घेतलं. त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी रंगमंचावर गेलो. आपसूकच तू वर का येत नव्हतास? याची त्यांनी माझ्याजवळ विचारणा केली. तेव्हा मी त्यांना म्हटलं की या पुरस्कारासाठी केवळ मीच पात्र आहे. विभागून पुरस्कार देण्याच्या निषेधार्थ मी वर येत नव्हतो. तेव्हा त्यांनी माझी गोड शब्दात चांगलीच कानउघाडणी केली. मोहन जोशी म्हणाले, ‘‘अरे बाळा पुरस्कार हा केवळ ऊर्जेचा एक स्रोत असतो. तुला भविष्यात हजारो पुरस्कार मिळतील. पण हा पुरस्कार नाकारू नकोस. पुरस्कारापेक्षाही महत्त्वाचं असतं ते केवळ काम. तू तुझं काम चालूच ठेव, त्यांचा हा संदेश मला आजही इंडस्ट्रीत वावरत असताना कामी येतो.’’

आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मी भरपूर खाबूगिरी केली आहे. मेनू कार्डमधील सर्व पदार्थ मी पाच वर्षांत चाखले आहेत. कॅन्टीनमधील आमलेट पाव, बनमस्का, समोसा पाव, समोसा सांबार या पदार्थाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. नाटकवाला माणूस म्हंटल्यावर चहा हवाच. कॉलेजच्या गेटच्या बाहेर चहाची गाडी लागायची. तिकडे रोजचा क्रीमरोल आणि चहा, मावा केक आणि चहा हा ठरलेलाच असायचा. दिवसातून तीन वेळा तरी मावा केक आणि चहा मला लागायचाच. स्वाती कुलकर्णी, समीर कुलकर्णी, गिरीश आठल्ये, विनोद सातव हे व असे अनेक मित्रांनी गच्च भरलेला माझा चमू होता. अनेक पथनाटय़, समूहगीतं, एकांकिका मी कॉलेज दिवसात केल्या. कॉलेजमध्ये असताना मी अभिनय कार्यशाळासुद्धा घ्यायचो. त्यामुळे कॉलेजची पाच वर्षे मी केवळ धमाल केली. एक एक दिवस जगलो. आजही कधी कॉलेजची आठवण आली तर मी आणि माझी बायको आवर्जून कॉलेजमध्ये जातो व दीप्ती हॉलच्या पायऱ्यांवर बसून आठवणींना उजाळा देतो.

शब्दांकन : मितेश रतिश जोशी