भन्साळी, रणवीर सिंग यांना स्मृती पुरस्काराने गौरवणार
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून चित्रपट आणि नाटय़ क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासह अभिनेता रणवीर सिंग यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नाटय़, संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणाऱ्या ‘दीनानाथ मंगेशकर स्मृती’ पुरस्कारांची घोषणा शनिवारी ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी प्रभुकुंज येथे पत्रकार परिषदेत केली.
हिंदी चित्रपटांतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेता जितेंद्र कपूर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आशाताईंनी दिली.
संगीत क्षेत्रातील सेवेसाठी अजय चक्रवर्ती, साहित्य क्षेत्रातील ‘वाग्विलासिनी पुरस्कार’ अरुण साधू यांना देण्यात येणार आहे, तर उत्कृष्ट नाटय़निर्मितीचा पुरस्कार ‘दोन स्पेशल’ या नाटकाला, प्रदीर्घ पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार दिलीप पाडगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, परतवाडा येथील ‘गोपाळ शिक्षण संस्थेचे’ सचिव शंकरबाबा पापळकर यांना सामाजिक कार्यासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी पुरस्कार देण्यात येणार आहे.

२४ एप्रिलला वितरण
हा पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिलला पार्ले टिळक महाविद्यालयात होणार असून मान्यवरांना आशा भोसले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. सोहळ्याचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ करणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर पंडित हरिहरन, राकेश चौरसिया, पंडित विजय घाटे, रशिद खान आणि कौशिकी चक्रवर्ती यांचा उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.