शिक्षण घेत असतानाच चित्रपट, दूरदर्शन मालिकेतील एखाद्या भूमिकेमुळे प्रसिद्धी, यश आणि ग्लॅमर मिळाले की, अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि शिक्षण मागे पडते. मात्र सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या ‘टाइमपास’मधील ‘दगडू’ने अर्थात प्रथमेश परबने अभ्यास आणि परीक्षेलाच महत्त्व देत एका बडय़ा कंपनीच्या जाहिरातीत काम करण्यास  नकार दिला.
प्रथमेश सध्या डहाणूकर महाविद्यालयात तृतीय वर्षांला शिकत आहे. ‘बँक अ‍ॅण्ड इन्शुरन्स’ हा त्याचा शेवटच्या वर्षांचा विषय आहे. ‘बालक पालक’ या चित्रपटात विशू आणि ‘टाइमपास’ या चित्रपटात दगडू या भूमिकांमुळे प्रथमेश प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यामुळे त्याला विविध चित्रपट, मालिकांसाठी भूमिकेच्या आणि विविध कंपन्यांकडून जाहिरातीचे प्रस्ताव येत आहेत. एका बडय़ा कंपनीच्या जाहिरातीसाठी त्याची निवडही झाली होती.
मात्र कंपनीकडून काही कारणामुळे चित्रीकरणाचे वेळापत्रक बदलले आणि नेमक्या महाविद्यालयाच्या परीक्षेच्या कालावधीतच तारखा आल्या. त्यामुळे प्रथमेशने परीक्षेलाच प्राधान्य द्यायचे ठरवले आणि जाहिरातीचा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही, असे कंपनीला नम्रपणे कळवले.

गेल्या काही दिवसात मला अभ्यास नीट करता आला नाही. त्यामुळे सध्या अभ्यास, अभ्यासासाठी असलेल्या प्रकल्पाची कामे यासाठी मी अधिक वेळ देत आहे. शिवाय शेवटच्या वर्षांची परीक्षाही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.  संधी काय पुन्हा मिळू शकते.
-प्रथमेश परब