महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या मनावर राज्य करणाऱ्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकण्यात आला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने बाळासाहेबांची भूमिका वठविली असून तो खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची भूमिका जगला. तर या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता प्रविण तरडेंनी देखील कामगार नेते दत्ताजी साळवी यांची महत्वाची भूमिका वठविली असून त्यांनी या चित्रपटाविषयीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

‘ठाकरे’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल ११ कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये प्रविण तरडे यांनी कामगार नेते दत्ताजी साळवी यांची भूमिका वठविली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रविण यांनी या चित्रपटाविषयीच्या काही आठवणी फेसबुकवर शेअर केल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ या चित्रपटासाठी मिशा कापल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘ठाकरे’ चित्रपटामध्ये दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेला न्याय देताना त्यांच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी आत्मसात करणं गरजेचं होतं. त्यामुळे दत्ताजी यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी प्रविण यांना मिशी कापणं गरजेचं होतं. ही भूमिका योग्यरित्या पार पाडावी यासाठी प्रविण यांनी पहिल्यांदाच त्यांची मिशी कापली. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बाळासाहेबांसाठी पहिल्यांदाच मिशी कापल्याचं त्यांनी म्हटलं.

प्रविण यांनी फेसबुकवर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोपैकी एक फोटो सेटवरचा आहे. या फोटोला कॅप्शन देत प्रविण यांनी ”ठाकरे’ .. कामगार नेते दत्ता साळवी .. पहिल्यांदाच मिशी कापली होती फक्त बाळासाहेबांसाठी’ ..असं म्हटलं आहे.

दरम्यान, ‘ठाकरे’मधील नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या कामाची प्रशंसा सर्वच स्तरामधून होत असून प्रविण तरडे यांनीही सध्या चर्चा रंगताना दिसत आहे. प्रविणने दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेला पूरेपुर न्याय दिल्याचं या चित्रपटात पाहायला मिळत आहे.