प्रत्येकाला काही विशिष्ट मार्गाने आयुष्य जगण्याची इच्छा असते. काही जणांना राजासारखे आयुष्य जगायचे असते, काही जणांना अत्यंत साधं आयुष्य जगणं आवडत आणि काहींना चित्रपट कथे सारखं किंवा मालिकेत घडत असणारं आयुष्य सत्यात जगायचं असतं. अशीच फिल्मी आयुष्य जगण्याची इच्छा मराठमोळा अभिनेता शिवराज वायचळने व्यक्त केली आहे.
नाटक, थ्रिल, रोमान्स आणि अॅक्शन यांचा खऱ्या जीवनात अनुभव घेता यावा असं त्याला वाटायचं आणि आता त्याने त्याच्या नवीन एमएक्स एक्सक्लुझिव्ह सीरिज ‘इडियट बॉक्स’मधून हे स्वप्न पूर्ण सुद्धा केलं आहे.
हेरगिरी करून, चोरुन प्रेयसी पर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेवटी प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याशी भांडण करणारा आकाश (शिवारज वायचळ) आपल्या आयुष्यातील प्रेम परत मिळवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा एक आगळीवेगळी प्रेमकहाणी आहे. त्याच्या प्रेयसीला परत मिळवण्याचा त्याचा हा शोध आपल्या टीव्ही मालिकेसारखाच मनोरंजक आणि आनंददायी आहे. या सीरिजचा प्रत्येक एपिसोड मनोरंजनाने परिपूर्ण आहे.
“या सीरिजमध्ये माणसाच्या आयुष्यातील विविध शैलींचा आणि आपण लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. या सीरिज मध्ये मैत्री, प्रेम, नाटक आणि शक्य त्या सर्व गोष्टी ज्या एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी करतो त्यांचा समावेश आहे. मी हे सर्व अनुभवण्याची इच्छा ठेवूनच या इंडस्ट्री मध्ये प्रवेश केला, वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न या मालिकेच्या ५ भागांनीं खरे केले! मात्र मला काय म्हणायचे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेबसिरीज पहावी लागेल ” इडियट बॉक्स बद्दल बोलताना शिवराज म्हणाला.
एमएक्स प्लेअरच्या ‘इडियट बॉक्स’ या सीरिजमध्ये शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे हे मुख्य भूमिकेत झळकणार असून त्यांच्या व्यतिरिक्त या सीरिजमध्ये स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टाकसाळे, प्रवीण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे आणि आशय कुलकर्णी हे मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार मंडळीही स्क्रीन शेअर करणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 5:21 pm