मंगळवार संध्याकाळी सुरु झालेल्या पावसाने आता उसंत घेतली आहे. मात्र या पावसाने दोन दिवसांत मुंबई आणि उपनगराला चांगलंच झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवस सतत कोसळलेल्या पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. यामध्येच मुंबईतील दामोदर नाट्यगृहामध्येदेखील पावसाचं पाणी शिरल्याचं दिसून आलं. या नाट्यगृहाचे काही फोटो अभिनेता सिद्धार्थ जाधवने ट्विटरवर शेअर केले आहेत. सोबतच त्याने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.

“शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभं रहायला शिकलो. जेथ नाटकं पाहिली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीने प्रयोग केले. त्या नाट्यगृहाचे असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरुन आलंय.. २०२० चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय ते पाहावत नाही. प्रार्थना…काळजी घ्या”, अशी पोस्ट सिद्धार्थने ट्विटरवर शेअर केली आहे.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी अचानकपणे पावसाला सुरुवात झाली आणि पाहतापाहता या पावसाने जोर धरला. दोन दिवस कोसळलेल्या या पावसामुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच दामोदर नाट्यगृहात पाणी शिरल्यामुळे येथील आसनेदेखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं.