‘पुष्पक विमान’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘शुभ लग्न सावधान’ ‘…आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमातून सुबोध प्रेक्षकांसमोर आला आणि पाहता पाहता आज तो लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्यामुळे सहाजिकच चाहत्यांमध्ये त्याच्याविषयी कायमच चर्चा रंगते. यामध्येच सध्या चर्चा रंगली आहे ती त्याच्या कलाविश्वातील पहिल्या कमाईची

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता म्हणून सुबोधकडे पाहिलं जातं. त्यामुळे सहाजिकच त्याची कमाईदेखील त्याच तोलामोलाची असणार हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र करिअरच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना स्ट्रगल करावा लागतो. तसाच सुबोधलादेखील करावा लागला. विशेष म्हणजे आज मानधनाची मोठी रक्कम घेणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात अगदी मोजक्या पैशांपासून केली होती. त्यामुळे सुबोधचं पहिलं मानधन ऐकलं तर अनेकांना धक्का बसेल.

सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याची कलाविश्वातील पहिली कमाई आणि पहिला चित्रपट कोणता हे सांगितलं आहे. सुबोधने त्याच्या करिअरची सुरुवात वीर सावरकर या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्याने छोटेखानी भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याला केवळ १०० रुपये मानधन मिळालं होतं.

“माझा पहिला चित्रपट. सुधीर फडके यांची निर्मिती असलेला “वीर सावरकर”,मदनलाल धिंग्रा लॉर्ड कर्झनची हत्या करतो तो सीन. मदनलाल धिंग्रा दारातून आतमध्ये प्रवेश करताना, दाराजवळ जो ब्रिटिश सैनिक थांबलाय तो मी.पाहिलं मानधन १०० रुपये. कामाचे दिवस —फक्त एक”,असं कॅप्शन सुबोधने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, आज सुबोध भावे हे कलाविश्वातील लोकप्रिय नावं आहे. अनेक दर्जेदार चित्रपट आणि उत्तम अभिनयकौशल्य यांच्या जोरावर सुबोधने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.