अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या केरळ राज्यासाठीच सध्या अनेकजण प्रार्थना करत आहेत. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आणि पाहता पाहता केरळचा बराच भाग पाण्याखाली गेला. शतकातल्या या आतापर्यंत सर्वात भीषण अशा महापुरामुळे बरंच नुकसानही झालं आहे. ज्यामुळे आता खुद्द केरळच्या मुख्यमंत्र्यांनीच आपल्या राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनाच मदतीचं आवाहन केलं आहे.

फक्त मंत्रीमहोदय आणि केरळचे स्थानिकच नव्हे तर आता या राज्याला मदत करण्यासाठी सेलिब्रिटीसुद्धा पुढे सरसावले आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणाऱ्या अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाच केरळमधील पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

केरळमधील काही सहकाऱ्यांशी आपण संवाद साधला असून, त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सुबोधने स्पष्ट केलं. ‘सध्याच्या घडीला केरळला फक्त आर्थिक मदतीचीच गरज नसून, पूर ओसरल्यानंतर नेमकं किती आणि काय नुकसान झालं आहे, याची कल्पना येईल. ज्यानंतरच खरी परिस्थिती काय आहे आणि नेमकी कोणत्या प्रकारची मदत केली जाणं अपेक्षित आहे हे कळणार आहे. मग ही मदत खाणं, औषधं, कपडे अशा कोणत्याही रुपात असू शकते. किंबहुना प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करण्यासाठीही पुढे येण्याची गरज भासू शकते’, असं म्हणत सुबोधने सर्वांनाच केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीचीच अधिक माहिची देणारी पोस्टही करणार आहे. त्यामुळे आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत ही कलाकार मंडळीसुद्धा संकटात सापडलेल्या देवभूमीच्या सहकार्यासाठी पुढे आली आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.