‘सचिन….’, हे नाव घेतलं की, सर्वात आधी डोळ्यासमोर एकच चेहरा येतो. तो चेहरा म्हणजे क्रिकेटमध्ये अनेकांनासाठी पुजनीय अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा. क्रिकेटला एखाद्या देवाची, धर्माची उपमा देणाऱ्या आपल्या देशात सचिन म्हणजे अनेकांचं आराध्य दैवत. मुळात त्याचा आदर्श घेऊन कित्येक तरुण खेळडूंनी याच खेळात करिअर करण्याची स्वप्न पाहिली आहेत. अशा सर्व होतकरु आणि नव्या जोमाच्या महत्त्वाकांक्षी खेळाडूंवर भाष्य करणारा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मी पण सचिन’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून सोशल मीडियावर नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्याच आला. स्वप्नीलनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. चित्रपटाचं पोस्टर आणि फर्स्ट लूक पाहता एका वेगळ्याच सचिनला भेटण्याची संधी मिळणार हे नक्की. ‘गणराज असोसिएट्स’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठी रॅपर ‘किंग जेडी’ म्हणजेच श्रेयश जाधवने घेतली आहे.

पाहा : भितीदायक ‘परी’ची बहुविध रुपं 

क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानक उलगडत जाणार हे पोस्टर पाहताच लक्षात येतंय. कारण पोस्टरवर क्रिकेट खेळाडूच्या पेहरावात एक लहान मुलगा आपल्याला पाहायला मिळत असून, त्याचा चेहरा दिसत नसला तरीही एकंदर पोस्टर पाहता त्या मुलाने उराशी असंख्य स्वप्न बाळगली असणार हीच अनुभूती होते. पुण्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, क्रिकेटवेड्या तरुणाईचं भावविश्व ‘मी पण सचिन’च्या माध्यमातून पाहता येणार आहे, असं चित्रपटाच्या टीमकडून कळत आहे.