28 September 2020

News Flash

‘सूर सपाटा’ मध्ये कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत उपेंद्र लिमये

उपेंद्र लिमये यांनी आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आहेत.

उपेंद्र लिमये

सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांमधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रत्येक भूमिका आणि त्यानुसार त्याचे उत्कंठावर्धक सादरीकरण यातलं उत्तम गणित उपेंद्र लिमयेंना जमलं आहे. आजवरच्या त्यांच्या विविध भूमिकांमध्ये आणखी एका आव्हानात्मक पात्राची भर पडली असून लाडे ब्रोज फिल्म्स प्रा.लि. प्रस्तुत ‘सूर सपाटा’ या आगामी मराठी चित्रपटात ते एका कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कुठल्याही क्षेत्रात दिशादर्शकाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असतं. शिक्षक-प्रशिक्षकांची दूरदृष्टी आणि स्वानुभव मुलांना केवळ योग्य ती दिशाच नाही तर त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देण्याचं काम करते. अशाच एका कुशल सारथीची भूमिका ‘सूर सपाटा’च्या निमित्ताने उपेंद्र लिमये साकारत आहेत. गावखेड्यातील आपल्या मातीतला खेळ म्हणजेच कबड्डीच्या अनुषंगाने या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मंगेश कंठाळे यांनी केले आहे तर अभिनय जगताप यांचे सुमधूर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. शाळेतल्या टवाळ मुलांमधील कौशल्य जाणून त्यांना कबड्डी खेळासाठी प्रवृत्त करताना, कधी काट्यावर धरणारे कडक प्रशिक्षक तर कधी मुलांच्या बाजूने उभे राहणाऱ्या प्रेमळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत उपेंद्र लिमये आपल्याला दिसणार आहेत.

हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे यांसारख्या तिकडंबाज अभिनेत्यांचा सूर तपासण्यासाठी उपेंद्र लिमये सज्ज झाले असून २२ मार्चला या होतकरू कबड्डीपटू आणि प्रशिक्षक यांच्यातील ‘सूर सपाटा’ पाहणं रंजक ठरेल. शिवाय किमान २५ दिग्गज कलाकारांचा ताफा या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार असून त्यांची नावं सध्या गुलदस्त्यात आहेत.

जयंत लाडे निर्मित, किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूर सपाटा’ या चित्रपटाच्यानिमित्ताने ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंसोबतचा हा रोमांचकारी खेळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवणारा आहे. ‘सूर सपाटा’ची वेगवान कथा मंगेश कंठाळे यांची तर पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांनी लिहीली आहे. संवादलेखनही अमित बैचे यांनीच केले आहे तर छायांकन विजय मिश्रा यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 6:52 pm

Web Title: marathi actor upendra limaye sur sapta played kabaddi coach
Next Stories
1 ‘भेद’च्या माध्यमातून अनुभवा थरारक प्रेमकथा
2 Happy Birthday Preity Zinta: हे पाच अविस्मरणीय चित्रपट
3 रणबीरच्या ‘अमृतभेटी’विषयी बिग बी म्हणतात..
Just Now!
X