हिंदीत आत्ताच्या फळीतील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कलाकार दिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेलताना दिसतात. त्या तुलनेत मराठीत मात्र लेखनापासून ते दिग्दर्शनापर्यंत चित्रपटाच्या सगळ्याच घटकांवर मातबरी असणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी आहेच आणि ती सातत्याने वाढते आहे. मराठीतील सध्याचे आघाडीचे कलाकार फक्त अभिनयापुरतेच मर्यादित राहिले नसून सातत्याने चांगल्या चित्रपटांचे दिग्दर्शनही करत आहेत. सुबोध भावे हे नाव त्यात आघाडीवर होतं आणि आहेच. मात्र त्याच्याबरोबर गिरीश कुलकर्णी, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, आदिनाथ कोठारे, चिन्मय मांडलेकर ही कलाकार मंडळी दिग्दर्शन क्षेत्रातही उतरली आहेत. मराठीत फक्त अभिनेतेच नव्हे तर अभिनेत्रींनीही दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली असून क्रांती रेडकर, मनवा नाईक यांच्यापाठोपाठ आता मृण्मयी देशपांडेनेही दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येते आहे.

गेल्या आठवडय़ात बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या ‘पर्पल पेबल प्रॉडक्शन’अंतर्गत नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे आणि त्याच्या दिग्दर्शकाचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘माझा छकुला’ ते ‘झपाटलेला २’ असा अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर आदिनाथ कोठारेने दिग्दर्शनाकडे मोहरा वळवला आहे. गेली चार वर्ष तो या चित्रपटामागे आहे. ‘पाणी’ असे या चित्रपटाचे नाव असून प्रियांका चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सध्या आदिनाथ नांदेडमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करतो आहे. गेली काही वर्ष सातत्याने नाटक-चित्रपट-टेलीव्हिजन या माध्यमांशी लेखक आणि अभिनेता म्हणून जोडल्या गेलेल्या प्रियदर्शन जाधवनेही दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट पूर्ण केला असून ‘मस्का’ हा त्याचा चित्रपट १ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी सांगताना मुळातच दिग्दर्शन हे आपल्या आवडीचं क्षेत्र होतं आणि आहे, असं त्याने सांगितलं. अभिनय हे सहजी घडलं त्यामुळे कलाकार म्हणून अभिनयक्षेत्रातला वावर जास्त राहिला असला तरी दिग्दर्शन हे आपलं स्वप्न होतं, असं त्याने सांगितलं.

सातत्याने चोखंदळ भूमिकांमधून मराठी-हिंदी चित्रपट आणि जाहिरातीतून ठसा उमटवणाऱ्या अभिनेता हृशिकेष जोशी यांचीही दिग्दर्शक म्हणून नवी भूमिका रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘होम स्वीट होम’ असे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेही दिग्दर्शनाकडे वळली असून ती दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करते आहे. या वर्षी प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री या दोघांनीही दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला, तर पुष्करनेही ‘उबंटू’सारखा लहान मुलांच्या शिक्षणाभोवती फिरणारा चित्रपट दिग्दर्शित केला. मराठी अभिनेते आणि अभिनेत्री दिग्दर्शक म्हणूनही यशस्वी ठरले आहेत. मनवा नाईक, क्रांती रेडकर यांनीही दिग्दर्शन के ले आहे. अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनीही दिग्दर्शक म्हणून ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ हा चित्रपट दिला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरही लेखक  म्हणून कार्यरत आहेच, आता तोही दिग्दर्शनाच्या तयारीत असल्याचे समजते.