शिवसेना पदाधिकाऱ्याने कार्यक्रमासाठी आमंत्रण दिल्यानंतर योग्य वागणूक दिली नसल्याची तक्रार मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केली आहे. भाग्यश्री मोटे हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे. मिथून खोपडे असं या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव असल्याचं भाग्यश्री मोटेने आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांनी आमची माफी मागावी अशी मागणी भाग्यश्री मोटेने केली आहे.

व्हिडीओत भाग्यश्री मोटे यांनी सांगितल्यानुसार, “८ जानेवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त मी नागपूरला गेले होते. आमचा कार्यक्रम नागपूरपासून जवळपास १८० किमी लांब चंद्रपूर येथील गडचांदूर येथे होता. सकाली पावणे आठ वाजता मी विमानतळावर पोहोचले. नऊ वाजेपर्यंत मला नेण्यासाठी कोणीच आलं नाही. त्यानंतर माझी सहकारी आली. त्यांची माणसं आली तेव्हा तयारीसाठी वेळ न देता कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून पुढे जाऊयात सांगण्यात आलं. चंद्रपूर येथे हॉटेलचं बुकिंग केलं असल्याचं सांगत तिथेच तयारी करा असं सांगण्यात आलं. थोडंसं आराम करुन बसल्यानंतर तयारी करण्यासाठी काय व्यवस्था केली असं विचारलं. त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी पुरवू असं सांगितलं होतं. चंद्रपुरात पोहोचलो तेव्हा हॉटेलचं बुकिंग करण्यात आलं नव्हतं. तिथे पोहोचल्यावर सगळ्या रुम बूक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. नंतर एका साध्या हॉटेलात आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यानंतर आम्हाला तयार होण्यास सांगण्यात आलं. पण त्यासाठी काही सुविधा देण्यात आली नव्हती. तुम्ही तयार व्हा आणि नाही केली तरी आहेत तशा आलात तरी चालेल असं उत्तर देण्यात आलं”.

पुढे तिने सांगितलं आहे की, “आम्ही तीन दिवसांपासून परतीच्या तिकीटाबद्दल विचारत होतो. त्यांनी परतीचं तिकीट काढलेलं नव्हतं. आम्ही तयारी केल्यानंतर परतीचं तिकीट असेल तरच कार्यक्रमाला जाऊ असं सांगितलं. यावर त्यांनी तिकीट बूक होईल असं उत्तर दिलं. त्यांनी नकार दिला असता तर कार्यक्रमाची वेळ निघून जाईल, बदनामी होईल असं सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला”.

“कार्यक्रमासाठी आम्ही अडीच तास दिले. त्यावेळीही आम्ही परतीच्या तिकीटाबद्दल विचारत होते. पण बाजूला असूनही ती व्यक्ती आमचा कॉल घेत नव्हती. अडीच तास थांबल्यानंतरही ते आम्हाला १० वाजेपर्यंत थांबा असं आग्रह करत होते, जे योग्य नव्हतं. आम्ही तेथून निघाल्यानंतर आमचे कॉल घेणे बंद केलं. मेसेजला उत्तरही दिलं जात नव्हतं. फोन बंद करण्यात आला,” असा अनुभव भाग्यश्री मोटेने सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

One incident from my event.

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

तुम्ही जेव्हा एखाद्या कलाकाराला बोलवता तेव्हा अशी वागणूक देणं योग्य नाही. एक महिला म्हणून आमच्याबद्दल काही जबाबदारी होती ती त्यांनी पूर्ण नाकारली. त्यांनी आमची माफी मागावी अशी मागणी भाग्यश्री मोटेने केली आहे.