फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) मुंबई प्रदेश अध्यक्ष राजू थाटे यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. केतकीच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे.
केतकीनं १ मार्च रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.
“महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे,” थाटे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. “यातून त्यांचा नवबौद्ध समाजाबाबतचा द्वेशही समोर येतो. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 11:04 am