News Flash

टेलीचॅट : रंगभूमीच्या ऋणात

मालिका विश्वातील कामगिरीमुळे मराठी प्रेक्षकांनी मानसीच्या अभिनयावर भरभरून प्रेम केले.

(संग्रहित छायाचित्र)

निलेश अडसुळ

प्रत्यक्षात जरी महिला पोलीस अधिकारी गुन्ह्य़ाचा छडा लावत असतील, गुन्हेगारांना शिक्षा देत असतील तरी माध्यमात मात्र पोलीस अधिकारी म्हणजे ‘पुरुषच’ असणार अशी प्रतिमा उभी केली जाते. याला निश्चितच काही अपवाद आहेत. परंतु बऱ्याच दिवसांनी ‘स्टार भारत’ हिंदी वाहिनीवरील ‘सावधान इंडिया’ या नव्या मालिकेच्या निमित्ताने एक महिला अधिकारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे नाना तऱ्हेच्या गुन्ह्य़ांमधून मार्ग काढणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मराठी अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने साकारली आहे. मालिका विश्वातून अनेक नवे चेहरे आपल्यासमोर येत असतात, पण त्यातले मोजकेच चेहरे आपल्या कायमचे लक्षात राहतात. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री मानसी कुलकर्णी.

साम मराठीवरील ‘विलक्षण’ या मालिकेतून पदार्पण केलेल्या मानसीने पुढे ‘झी मराठी’वरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाचे पात्र साकारले आणि ती घराघरांत पोहोचली. अभिनयाची उत्तम जण असलेल्या मानसीने ‘फु बाई फु’ या मालिकेतून विनोदाचे माध्यम हाताळले, तर पुढे ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवर आलेल्या ‘१७६० सासूबाई’ या मालिकेतही तिने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सुनेच्या भूमिकेत बहार उडवून दिली होती. मराठीतून सुरू झालेला तिचा प्रवास आता हिंदी मालिकांपर्यंत पोहोचला आहे. या यशाविषयी बोलताना आपल्या यशाचे गूढ हे रंगमंचीय आविष्कारात असल्याचे ती सांगते. मालिकांपर्यंत पोहोचण्याआधी एकांकिका आणि नाटकामधून अभिनयाचा पाया मजबूत झाला. ‘डहाणूकर महाविद्यालया’त शिकताना कॉलेजमधली पाच वर्षे एकांकिकेला वाहून घेतले होते, असे ती सांगते. तिच्या मते, प्रत्येक कलाकाराने ही प्रक्रिया अनुभवायला हवी. कारण तुम्ही आज एकांकिकेत सहभागी झालात आणि उद्या तुम्हाला प्रमुख भूमिका दिली असे होत नाही. त्यासाठी काही वर्ष त्या प्रक्रियेचा भाग व्हावे लागते ज्यात आपण तांत्रिक बाबींपासून ते एकमेकांसोबत कसं जुळवून घ्यायचं इथपर्यंत सगळं काही शिकतो. त्यामुळे पाया भक्कम होतो आणि एकदा तो भक्कम झाला की मग मनासारखी उंची गाठता येते, असे ती सांगते. याच प्रक्रियेतला एक गमतीशीर किस्सा मानसी सांगते, एकांकिकेचा प्रवास सुरू झाला की घरच्यांचा विसर पडतो. दिवसरात्र नाटक, नाटक आणि नाटक हेच सुरू असल्याने आपली मुलं नक्की काय करत आहेत, असा घरच्यांनाही प्रश्न पडतो. माझ्या पहिल्या एकांकिकेचा प्रयोग पाहायला आई आवर्जून आली होती आणि अवघ्या काही सेकंदांसाठी असलेली माझी भूमिका पाहून म्हणाली, ‘या दोन सेकंदांसाठी तू वर्षभर घरापासून लांब राहिलीस’. प्रत्येक आईला हे वाटणं स्वाभाविक आहे, पण यातूनच कलाकार घडत असतात. पडद्यामागे काम करताना स्टेजवरच्या कलाकारांना ‘साधा अभिनय जमत नाही’ असं कायम वाटायचं, पण जेव्हा ‘गब्बर वेड्स बसंती’ या एकांकिकेतून प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली तेव्हा कळलं, अभिनय करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. समोर बसून टिप्पण्या करणं खूप सोपं असतं, पण नाटकाला एका विशिष्ट उंचीवर न्यायचं काम कलाकार करत असतात याची तेव्हा जाणीव झाली, असं मानसी सांगते.

मालिका विश्वातील कामगिरीमुळे मराठी प्रेक्षकांनी मानसीच्या अभिनयावर भरभरून प्रेम केले. पण या प्रसिद्धीचे अनेकदा दडपण येते असेही ती सांगते. प्रसिद्धी मिळण्याआधी आपण कुठेही, कसेही वावरलो तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. पण एकदा लोक आपल्याला ओळखू लागले की, समाजातील आपल्या वागण्या-बोलण्यावर मर्यादा येतात. आपल्याला प्रत्येक कृतीत सजगता बाळगावी लागते. किंबहुना आपण अधिक जबाबदार होत जातो, असेही म्हणता येईल. कारण प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात म्हणजेच आपण त्यांचे प्रतिनिधित्व करत असतो. आपल्या वागण्यातून तेही काहीतरी घेत असतात म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्या कामात आणि वैयक्तिक जीवनातही जबाबदारीने वागण्याचे भान येत असल्याचे ती सांगते.

मालिका आणि नाटक असे दुहेरी माध्यम हाताळताना नाटकातील काही वेगळेपण ती विषद करते. तिच्या मते मालिकेपेक्षा नाटक अधिक सजीव राहते. कारण मालिकेचा एकदा भाग चित्रित होऊन प्रक्षेपित झाला की त्यात काहीही बदल करता येत नाही. परंतु नाटक प्रयोगानुसार अधिक रंगत जाते, आपल्याला आपल्या जागा सापडत जातात, पात्राशी एकरूप होता येते, काही नवीन सुचले तर भर घालता येते त्यामुळे प्रत्येक प्रयोग हा अधिकाधिक तरुण करण्याचा प्रयत्न कलाकारांना करता येतो, असं तिने सांगितलं.

सध्या ‘भूमिकन्या सीता’ या नाटकात मानसीने सीतेची भूमिका साकारली आहे. परंतु आजवर कधीही न पाहिलेली सीता या नाटकात मामा वरेरकरांनी रेखाटली आहे. स्त्रीवादाच्या अंगाने लिहिलेल्या या नाटकाविषयी मानसी सांगते, आजवरच्या कथा कहाण्यांमध्ये रामाची प्रतिमाच केवळ सकारात्मक दाखवण्यात आली आहे, पण सीता, ऊर्मिला यांच्या बाजूने विचार करायला लावणारे हे नाटक आहे. यात असलेला स्त्रीवाद आणि जातीय अंगाने केलेली मांडणी आजच्या काळातही लागू होते. असे पात्र साकारताना आपणही विचारांनी परिपक्व होत जातो, असे मानसी म्हणते. ‘सावधान इंडिया’ या हिंदी मालिकेत मानसीने पोलीस निरीक्षक प्राजक्ता भोसलेची भूमिका साकारली आहे. त्या भूमिकेविषयी मानसी सांगते, या मालिकेत केवळ पोलीस आणि पोलिसांचे काम दाखवले जाणार नाही तर त्यांचे वैयक्तिक आयुष्य, कामामुळे त्यात येणाऱ्या अडचणी यादेखील गोष्टींना महत्त्व दिले जाणार आहे. मराठीतून हिंदीमध्ये जाताना फारसा फरक जाणवत नाही, कारण भाषा बदलली तरी कामाचे गांभीर्य सगळीकडे सारखेच असते. फक्त हिंदी वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा असल्याने आपल्याही प्रसिद्धीच्या कक्षा रुंदावतात, असं तिने स्पष्ट केलं.

काकडे काकांच्या आठवणी

‘आविष्कार’ निर्मित ‘भूमिकन्या सीता’ या नाटकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मानसी काम करत असली तरी तिचे आविष्कारशी असलेले नाते जुने आहे. महाविद्यालयीन जीवनात आविष्कारशी जोडलेले नाते आजही तसेच असल्याचे ती सांगते. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे काका यांच्या स्मृतींना उजाळा देताना मानसी म्हणते, आजवर काकांसोबत काम करताना तरुणांचे काकांशी असलेले जवळचे संबध हे त्यांचे वैशिष्टय़ वाटते, कारण त्यांनी आपली मते कधीच कुणावर लादली नाहीत. तरुण कलाकारांचा कल, त्यांची संकल्पना समजून ते आमच्यापैकीच एक व्हायचे. अनुभवाची एवढी मोठी शिदोरी सोबत असतानाही त्याचा तसूभर अहंकार त्यांनी कधी बाळगला नाही. एखादी कलाकृती अधिक चांगली कशी होईल याकडेच त्यांचा अधिक कल असे, अशी आठवण तिने सांगितली.

वाचन संस्कृती समृद्ध होवो..

अभिनयापलीकडे मानसी अभिवाचनाच्या उपक्रमांशीही जोडली गेली आहे. याविषयी ती सांगते, पुस्तक हे तुमचे अनंत काळाचे सोबती आहेत. तुम्हाला कंटाळा आला तरी तुम्ही सहज पुस्तकात रमू शकता. पण याची विरोधाभासी प्रतिमा आज समोर येते आहे. ‘वाचन म्हणजे बोरिंग काम’ अशा प्रतिक्रिया लोक देतात. पण प्रत्येकाने वाचायला हवं, कारण पुस्तकांमध्ये असलेली पात्रं, आशय आपल्याला खूप काही शिकवून जातात. अभिवाचनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे साहित्य वाचता येते. विशेष म्हणजे आपल्या वाचनातून ते चार लोकांपर्यंत पोहोचते याचा अधिक आनंद वाटतो, असं ती म्हणते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:36 am

Web Title: marathi actress manasi kulkarni in new series savdhaan india abn 97
Next Stories
1 चित्ररंजन : ऐतिहासिकपटाचा गड राखला
2 विदेशी वारे : ‘ऑस्कर’ सूत्रसंचालकाविना..
3 पाहा नेटके : भॉ ऽऽ कथा
Just Now!
X