मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईक अखेर विवाहबद्ध झाली आहे. प्रदीप खरेरासोबत मानसीने साताजन्माची गाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसी आणि प्रदीप यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.

काही दिवसांपूर्वी मानसीने एक इन्स्टा पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून तिची आणि प्रदीपची चर्चा होती. त्यातच या दोघांनी साखरपुडा करत आणखी एक गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यामुळे ही जोडी विवाहबद्ध कधी होणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. मात्र, अखेर २०२१ या नव्या वर्षामध्ये या दोघांनी साताजन्माची गाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला मानसी व प्रदीप यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि आप्तेष्ट सहभागी झाले होते.

Video: मानसी नाईकच्या आईने घेतला भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर रंगली चर्चा

प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर आपल्या डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मानसीने आतापर्यंत ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते.