अवघ्या काही दिवसांतच या वर्षाची सांगता होणार आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे वर्ष कसं काय सरसर निघून गेलं हाच प्रश्न अनेकांच्या मनात सध्या घर करु लागला आहे. त्यातही अनेकांच्या मनात रुखरुख आहे ती म्हणजे यंदाच्या वर्षी फसलेल्या संकल्पांची. नवीन वर्ष आणि हटके संकल्प हा जरी आता एक ट्रेंड बनला असला तरीही खूप कमी जणांचे संकल्प पूर्णत्वास जातात हेच खरे. काही कारणास्तव धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या धावपळीत सर्व काही निभावूनन नेताना कळत-नकळत या संकल्पांकडे दुर्लक्ष होतं. पण, तरीही सध्याच्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी कोणता संकल्प करायचा हा प्रश्न अनेकांच्याच मनात आल्यावाचून राहात नाही. आपल्या नवी वर्षांच्या संकल्पाबद्दल सांगतेय अभिनेत्री नम्रता गायकवाड

नविन वर्षाची सुरुवात आपण सर्वच काहीना काही संकल्प करून करतो पण ते पूर्ण होतातच असे नाही. पण मला सांगायला आनंद होतोय की मी २०१५ मध्ये दोन संकल्प केले होते ते दोन्ही संकल्प पूर्ण झाले आहेत. एक म्हणजे गिटार शिकणे. लवकरच रसिक प्रेक्षकांना व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून मी त्याची एक झलक दाखवणार आहे. दुसरे म्हणजे दुसऱ्या भाषेत एखादा सिनेमा करावा अशी माझी इच्छा होती तीही यावर्षी पूर्ण झाली. पुढच्या वर्षी माझा एक मल्याळम सिनेमा प्रदर्शित होणार आहे. निसर्गाने मला भरभरून दिले आहे. आता माझी वेळ आहे त्याला काहीतरी देण्याची. पर्यावरणाची काळजी घेत यावर्षी मी भरपूर झाडे लावणार आहे. हा माझा संकल्प नाही तर माझी अपूर्ण इच्छा आहे. येत्या वर्षात मी ती नक्कीच पूर्ण करणार.

माझे नविन वर्षाचे सेलिब्रेशन हे नाताळ पासुनच सुरू होते. सिनेमांचे चित्रिकरण करत नसेन तर पूर्ण वेळ कुटुंबासोबत सेलिब्रेशन करते. पण कोणते चित्रिकरण असेल तर मग टीमसोबत सेलिब्रेशन हे होतेच. खरंतर नाताळ हा माझा आवडीचा सण आहे. बुध्दांनंतर ज्या व्यक्तिच्या विचारांनी मला प्रेरीत केले तो म्हणजे येशू. प्रेमाचा संदेश जगभर पसरविणाऱ्या विचांरांमुळेच आयुष्यात कठीण प्रसंग आले तरीही नैराश्य येत नाही. खूप पॉझीटीव्हली मी ती सिच्युएशन हॅण्डल करू शकते. त्या कठीण काळात माझे कुटुंब नेहमीच माझ्यासोबत असते. आपणा सर्वांना माझ्याकडून नाताळ आणि नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!!