फॅशन डिझाइनर जान्हवी मनचंदाला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली. न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर न राहिल्यामुळे अखेर न्यायालयाने तिला एक हजार रुपयांचा दंड आकारत जामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र हे सारं खोटं असून जाणीवपूर्वक प्राजक्ताची बदनामी केली जात असल्याचं प्राजक्ताच्या वकिलांनी प्रताप परदेशी यांनी सांगितलं आहे.

“माझी अशील प्राजक्ता माळीविरुद्ध खोटी खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तिला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाहीत. जुलै महिन्यातच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्याला स्थगिती दिली आहे. मात्र, फिर्यादी आणि त्यांच्या वकिलांनी एका खासगी वृत्तवाहिनीली खोटी माहिती देऊन प्राजक्ताची जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत”, असं वकील प्रताप परदेशी यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, ”सत्र न्यायालयात आव्हान दिल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत कुठलीही गोष्ट करु शकत नाही. परंतु, या आधी समन्स बजावले नसतानाही खोटी माहिती देऊन आमच्या अशीलाची माध्यमातून बदनामी केली जात आहे. सध्या सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने प्राजक्ता माळी याविषयी कोणतेही भाष्य करू शकत नाहीत. मात्र, निकालानंतर बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल”.

काय आहे प्रकरण?

एका फॅशन शोदरम्यान जान्हवीने दिलेले कपडे योग्य नसल्याचं कारण देत प्राजक्ताने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली होती, असा आरोप जान्हवीने केला आहे. याप्रकरणी प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही व्हायरल झाला होता. मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं प्राजक्ताने स्पष्ट केलं होतं.

‘जान्हवीने व्हायरल केलेले फोटो आणि व्हॉट्स अॅप चॅटचे स्क्रिनशॉट खोटे आहेत. ती माझी फॅशन डिझाइनर होती आणि कपड्यांवरून माझे तिच्याशी मतभेद झाले होते. पण तिला मी मारहाण केली नाही. तिच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. असं काही घडलं असतं तर सेटवरील लोकांनासुद्धा कळलं असतं,’ असं ती म्हणाली होती.