प्रतिनिधी

करोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच या काळातही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीने गणेशोत्सव कसा साजरा करायला आवडतो हे सांगितलं आहे.

“माझ्या घरी १० दिवसांचा गणेशोत्सव असतो. मला पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करायला आवडतं. पाना-फुलांशिवाय इतर कोणत्याही गोष्टी सजावटीसाठी वापरत नाही. रोषणाईसाठी आम्ही गणपतीसमोर २४ तास दिवा तेवत ठेवतो. गणपतीची मूर्तीसुद्धा माती, शेण, इत्यादींनी तयार केलेली असते. आमच्या घराजवळ कृत्रिम तलाव उभारले जातात. पूर्वी आम्ही त्यात विसर्जन करायचो. पण आता घरच्या घरी विसर्जन करतो. मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने विसर्जित केली की १० मिनिटांत विरघळते”, असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, “गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेते. पुण्याच्या कलाकार ढोल पथकात सहभागी होते. सराव नसेल तर कंबरेला ढोल लावून अर्धा तासही उभं राहाणं खरं तर शक्य नाही. भरपूर सराव करावा लागतो. ती एक प्रकारची साधना आहे. डीजेमध्ये ध्वनिवर्धकाच्या (लाऊडस्पीकर) अक्षरश: भिंतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने मिरवणूक चांगली. अर्थात, तिथेही प्रदूषण होतंच. पण ते कमी करायचं असेल तर छोटी मिरवणूक काढावी. मी लहान असताना पुणे महोत्सव व्हायचा, आजही होतो. पूर्वी तिथे हेमा मालिनी नृत्य सादर करायच्या. ते पाहायला मी जायचे. हळूहळू मीसुद्धा महोत्सवात नृत्य सादर करू लागले. पूर्वीपेक्षा आता पुण्यातलं सांस्कृतिक वातावरण कमी झालं आहे. पण इतर क कोणत्याही शहराच्या तुलनेत आजही पुण्यात सांस्कृतिक वातावरण जास्त चांगलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांची भूमिका जनजागृतीची होती. पण मूळ कल्पना बाजूला ठेवून आपण अतिशयोक्ती करत आहोत. मला खरं तर ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना योग्य वाटते. पण काही ठिकाणी तर अक्षरश: पाठीला पाठ लावून गणपतीचे मंडप उभे असतात. दोन्ही मंडपातल्या गाण्यांचा आवाजही एकमेकांच्या मंडपात जात असतो. त्यामुळे गोंधळ होतो. काहीच कळत नाही. हे उत्सवाचं एक टोक झालं. पण या वर्षी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे, ते उत्सवाचं दुसरं टोक आहे. यातून सुवर्णमध्य काढून सामाजिक भान जपत उत्सव साजरा के ला पाहिजे. लोकांनी घराबाहेर पडून छानपैकी रोषणाई, देखावे पाहावेत, असं मला वाटतं. गणेशोत्सव हे माणसाच्या उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थांचं प्रतीक आहे, असं मी मानते. माणूस जन्माला येतो त्याप्रमाणे गणपतीचं आगमन होतं. जन्माला आल्यानंतर माणूस जसा जग अनुभवतो, तसा गणपती काही दिवस आपल्याकडे राहतो. शेवटी माणसाचा मृत्यू होतो तसे गणपतीचं विसर्जन होते”.

सौजन्य : लोकप्रभा