दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे राणा डग्गुबती. ‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनमुळे त्याने बॉलिवूडमध्येही स्थान मिळवलं. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झाली आहे. आपल्या या चाहत्यांसाठी तो या नवीन वर्षात एक खास भेट देणार आहे. त्याचा आगामी ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन स्क्रीन शेअर करणार होती. मात्र आता कल्कीच्या जागी एका मराठी अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची प्रेरणा १९७१ साली आलेल्या राजेश खन्ना यांच्या चित्रपटावरुन घेण्यात आली आहे. राणाचा हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून यामध्ये तो ‘बनदेव’ची भूमिका वठविणार आहे. त्यासोबतच कल्की कोचलीनदेखील स्क्रीन शेअर करणार होती. मात्र आता कल्कीऐवजी मराठी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर या चित्रपटात झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

श्रियाने यापूर्वी काही वेबसीरिज आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र ‘हाथी मेरे साथी’च्या माध्यमातून ती पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे राणासोबत ती डेब्यु करत असल्यामुळे हा चित्रपट तिच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगूमध्ये ‘अरण्या’ आणि तामिळमध्ये ‘कादन’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटामध्ये राणा आणि श्रियाव्यतिरिक्त विष्णु विशाल, जोया हुसैनदेखील झळकणार आहेत. तमिळ दिग्दर्शक प्रबू सोलोमोन्स ‘हाथी मेरे साथी’च्या माध्यमातून हिंदीत पदार्पण करत आहे. तर प्रेक्षकांसाठी चित्रपटात वीएफएक्सची पुरेपूर मेजवानी असणार आहे.