12 December 2017

News Flash

सोनाली म्हणते, सलमाननंतर सगळ्यांना माझ्या लग्नाची घाई!

सोनालीच्या जनरेशनमधील सर्वांची लग्ने झाली आहेत.

ऑनलाइन टीम | Updated: March 14, 2017 7:27 PM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

बॉलिवूडमधील कलाकारांच्या लग्नाची आणि अफेअरची चर्चा अनेकदा ऐकायला मिळते. या चर्चेतून चाहत्यांना फक्त कलाकारांच्या चित्रपटामध्येच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही रस असल्याचे दिसून येते. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात डोकावण्यात फक्त बॉलिवूड कलाकारांचेच चाहते नव्हे; तर मराठी कलाकारांचेही चाहते आघाडीवर आहेत. सध्याच्या घडीला मराठी प्रेक्षकांना ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची घाई असल्याचे दिसून येते. त्यामुळे ती ज्या कार्यक्रमात हजेरी लावते तिथे तिला लग्नाच्या प्रश्नावर उत्तर द्यावे लागते. ‘लोकसत्ता फेसबुक लाईव्ह चॅट’मध्येही तिची या प्रश्नातून सुटका झाली नाही. ‘लाईव्ह’ संवाद साधताना एका चाहत्याने सोनालीला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. या कार्यक्रमात तिच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील उपस्थित होती. सोनालीला विचारलेल्या प्रश्नानंतर दोघींच्याही चेहऱ्यावर एकच हश्या पिकल्याचे पाहायला मिळाले.

सोनालीला विचारण्यात आलेल्या लग्नाच्या प्रश्नावर मृण्मयीने देखील उत्सुकता दाखवली. आम्ही देखील तिला हेच सांगत आहोत, असे सांगत मृण्मयीने चाहत्याने विचारलेल्या प्रश्नात आणखी ट्विस्ट निर्माण केला. मग चाहत्याला पडलेला प्रश्न आणि मृण्मयीने दिलेले प्रोत्साहन याची सांगड घालत सोनालीने लग्नावर हसतमुखाने उत्तर दिले. लग्नाच्या प्रश्नावर बोलताना तिने थेट सलमानचाच आधार घेतल्याचेही पाहायला मिळाले. सोनाली म्हणाली की, माझ्या जनरेशनच्या सर्वांची लग्न झाली आहेत. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत माझा सलमान झालाय असे वाटते. मला लग्नाची काही घाई नाही. लग्न हे नशिबावर अवलंबून असून, वेळ आल्यावर नशिबात असेल तो जोडीदार मला मिळेल. लग्नाची घाई नाही म्हणणाऱ्या सोनालीने स्थळ असेल तर आई-बाबांना सुचवा, अशी गमतशीर विनंती देखील चाहत्यांना केली.

लग्न हे नशीबावर अवलंबून असल्याचे सोनालीने म्हटले असले तरी तिने नवरा कसा हवा, याबद्दलच्या अपेक्षाही यावेळी सांगितल्या. नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना सोनाली म्हणाली की, हातात हात धरुन मला रोखण्यापेक्षा मला आत्मविश्वासाने भरारी घे म्हणणारा जोडीदार हवा आहे. माझा हात धरून मला सावरण्यापेक्षा मला आत्मविश्वास देणाऱ्याचा हातात हात घेणे मी पसंत करेन.

First Published on March 14, 2017 7:27 pm

Web Title: marathi actress sonalee kulkarni compared marriage question with salman khan