18 January 2019

News Flash

कठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?

विविध विषयांवर शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांनासुद्धा कठुआ बलात्कार प्रकरणाने नि:शब्द केलं.

स्पृहा जोशी

जम्मू- काश्मीर येथील कठुआमध्ये आठ वर्षांच्या चिमुरडीवर नराधमांनी बलात्कार केला आणि तिची हत्या केली. या घृणास्पद कृत्याची वाच्यता होताच संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली. कोणी त्या पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली, तर बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना फाशी द्या असं म्हणत सोशल मीडियावर अनेकांनीच एल्गार पुकारला. पण, यातून साध्य काय झालं, हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनीही सर्वांचच लक्ष वेधलं. एकिकडे सर्वच स्तरांतून कठुआ बलात्कार पीडितेसाठी प्रत्येकजण काही ना काही लिहितोय, आपल्या परीने व्यक्त होतोय. पण, या सर्व गोष्टी कोणापर्यंत पोहोचून परिस्थिती खरंच बदललीये का, असा महत्त्वाचा प्रश्न अभिनेत्री स्पृहा जोशी हिने उपस्थित केला आहे.

विविध विषयांवर वक्तव्य करत शब्दांच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देणाऱ्या स्पृहाने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली हळहळ व्यक्त केली आहे. काय फरक पडतो, मी नाही लिहिलं तर? असा लक्षवेधी प्रश्नसुद्धा तिने या पोस्टमधून उपस्थित केला. कवीमनाची स्पृहा प्रेक्षकांच्या तशी ओळखीचीच. पण, अस्वस्थ आणि हताश, या परिस्थितीपुढे हतबल झालेली स्पृहा आणि तिच्या मनातील या भावना पाहता सर्वचजण पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पडत आहेत.

विविध विषयांवर शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांनासुद्धा कठुआ बलात्कार प्रकरणाने नि:शब्द केलं आहे हे खऱ्या अर्थाने स्पृहाची पोस्ट वाचताना लक्षात येतंय. ‘मला जे काही वाटतंय त्याने तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे? आठ वर्षांचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे… #kathuarape असे हॅशटॅग्स येत राहिले फक्तं. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटींग्स, शुटिंग्स, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स… सगळं.. रोजचंच.. रोजच्यासारखंच….’, असं म्हणत तिने एक दाहक वास्तव सर्वांपुढे ठेवलं आहे. स्पृहा आणखी काय म्हणालीये, हे या पोस्टमधून तुम्हाला कळेलच….

First Published on April 16, 2018 2:29 pm

Web Title: marathi actress spruha shirish joshis facebook post on kathua gang rape case