आजवर बऱ्याच कलाकारांनी चित्रपटांमध्ये आरजे म्हणजेच रेडिओ जॉकीची भूमिका साकारली आहे. अशा या भूमिकांमध्ये आता आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानचं. ‘होणार सून मी ह्या घरची’या मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे.

झेलू एंटरटेनमेन्टसची निर्मिती असणाऱ्या एका चित्रपटातून तिची ही नवी भूमिका पाहता येणार आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असेही एकदा व्हावे’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री रेडिओचं अनोखं विश्व अनुभवणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून तेजश्रीसोबतच अभिनेता उमेश कामतही स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चित्रपटाची जमेची बाजू ठरु शकते. ६ एप्रिलला ‘असेही एकदा व्हावे’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘असेही एकदा व्हावे’ चे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी तेजश्रीने आपल्या व्यक्तीरेखेवर कसून अभ्यास केला होता. त्यासाठी तिने जवळपास महिनाभर आरजेच्या खास प्रशिक्षण कार्यशाळेलाही हजेरी लावली होती. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा त्यांचा संवाद, लकबी, शब्दांचे उच्चार, त्यांचा हजरजबाबीपणा, तसेच विषय खेळवत ठेवण्याची किमया, आणि गाण्यांद्वारे केले जाणारे श्रोत्यांचे मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्री या वर्कशॉपमध्ये शिकली. त्यासाठी तिने रेडीओ स्टेशनला भेट देखील दिली. तिथे काम करत असलेल्या आरजेच्या कामाचे जवळून निरीक्षण करत आणि संवाद साधत आपल्या व्यक्तीरेखेत जिवंतपणा आणला.

आपल्या या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, ‘भूमिका उत्तमरित्या साकारण्याकडेच माझा कल असतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण व्हाव्यात यासाठी मी कुठलीही मेहनत घ्यायला तयार असते. म्हणूनच आरजेची भूमिका साकारण्यापूर्वी मी त्याचा सखोल अभ्यास केला. सुरुवातीला थोड कठीण वाटले होते, एकाच वेळी तीन-चार ठिकाणी लक्ष द्यावे लागत होते, पण हळूहळू मला ते जमू लागले, आणि आवडूही लागले.’ तेव्हा आता तिचा एकंदर उत्साह पाहता आरजेच्या रुपातील तेजश्री पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे हे नक्की.

वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?