News Flash

फेब्रुवारीत प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट

या महिन्यात बॉलिवूडचे पाच चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आम्ही दोघी, वेलकम टू न्यूयॉर्क, अय्यारी, पॅडमॅन

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात फक्त एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा होती किंबहुना अजुनही आहे, तो म्हणजे ‘पद्मावत’. या बिग बजेट चित्रपटाचा धसका घेत इतर चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात रसिकांसाठी चित्रपटांची चांगलीच मेजवानी आहे, असं म्हणायला हरकत नाही. या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या काही उल्लेखनीय चित्रपटांचा आढावा घेऊयात..

आम्ही दोघी-


मराठी चित्रपटांमध्ये मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांची मुख्य भूमिका असलेला ‘आम्ही दोघी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलगी, मैत्रीण, बाप- मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना हळूवार स्पर्श करणारा हा चित्रपट. अभिनेत्री, कॉस्च्युम डिझायनर, सह-दिग्दर्शक म्हणून सिनेरसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. २३ फेब्रुवारीला ‘आम्ही दोघी’ प्रदर्शित होणार आहे.

पॅडमॅन-


अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘पॅडमॅन’ ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच्या ट्रेलर आणि पोस्टर्सना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने एव्हाना अनेकांना चित्रपटाचा विषय समजला आहे. अक्षयसोबतच राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात पाहायला मिळतील. या बायोपिकच्या माध्यमातून अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

अय्यारी-


‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘स्पेशल २६’, ‘बेबी’ यांसारख्या दमदार चित्रपटांचा दिग्दर्शक नीरज पांडेचा ‘अय्यारी’ ९ फेब्रुवारी रोजीच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत, मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि नसिरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे.

सोनू के टिटू की स्वीटी-


कार्तिक आर्यन आणि नुशरत भारूचा ही जोडी पुन्हा एकदा ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून ही जोडी विशेष प्रसिद्धीच्या झोतात आलेली. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटाचा दिग्दर्शक लव रंजन आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिल जंगली-


तापसी पन्नू आणि साकिब सलीम यांची मुख्य भूमिका असलेला ‘दिल जंगली’ हा चित्रपट १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. आलिया सेन या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

वेलकम टू न्यूयॉर्क-


सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांज, करण जोहर, रितेश देशमुख, सुशांत सिंह राजपूत, राणा डगुबत्ती आणि बमन इरानी अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा कॉमेडी चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 3:09 pm

Web Title: marathi and bollywood upcoming films in february aamhi doghi padman aiyaary and more
Next Stories
1 झीनत अमान यांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या व्यावसायिकाला अटक
2 Video: ‘वीरे की वेडिंग’मध्ये दिसेल जिमी शेरगिलचा अनोखा अंदाज
3 मुलीसाठी अभिनेत्याने घेतला धार्मिक समजूतींपासून दूर राहण्याचा निर्णय
Just Now!
X