दूरचित्रवाहिन्यांवरील वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘बिग बॉस’ या हिंदी कार्यक्रमाने एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या १५ एप्रिपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू होत आहे. या शोमध्ये ‘बिग बॉस’ कोण यावर सगळा खेळ अवलंबून आहे. हिंदीत हा बॉसचा आवाज सुरुवातीपासून सलमान खाननेच ताब्यात घेतला आहे. तर मराठीत या शोचा ‘बिग बॉस’ प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर असणार आहेत. ‘बिग बॉस चाहते है!’ हे वाक्य जेव्हा कानावर पडते तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचेही लक्ष त्या आवाजाच्या दिशेने वळते आणि आता काय घडणार याची उत्सुकता असते. आता हे सर्व आपल्या मायबोलीत घडणार आहे. ‘बिग बॉस’ नेमक्या काय सूचना देईल, त्यासाठी त्यांचे खास संवाद काय असतील, त्याचा आवाज कसा असेल, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतापासूनच प्रश्न निर्माण झाले आहेत. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. घरातील सदस्यांना कधी प्रेमाने समजावणे तर कधी आपला धाकही निर्माण करत असतो. मराठी ‘बिग बॉस’मध्ये ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत. ‘बिग बॉस’च्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे आता त्यांच्या धाकाखाली कोणती मंडळी असणार याचे उत्तरही याच महिन्यात मिळणार आहेत. मार्चअखेरीस ‘बिग बॉस’चे घर त्याच्या सदस्यांनी भरलेले असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.