16 December 2017

News Flash

जयश्रीबाईंना आजही आठवते नकलाकार, खोडकर नयन भडभडे!

रिमाताईंच्या आठवणी सांगताना बापटबाईंचा आवाज कातर झाला होता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 18, 2017 2:52 PM

रिमा लागू

सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात रिमा लागू हे नाव परिचयाचं असलं तरी हुजूरपागा प्रशालेत आठवी इयत्तेत शिक्षण घेणारी खोडकर, नकलाकार नयन भडभडेच मला आजही आठवते, अशा शब्दांत शिक्षिका जयश्री बापट यांनी रिमा लागू यांच्या आठवणींना उजाळा दिला. रिमाताईंच्या आठवणी सांगताना बापटबाईंचा आवाज कातर झाला होता. आपल्या विद्यार्थिनीबद्दल असं काही ऐकायला मिळणं खूपच दुःखद असते. पण मृत्यूपुढे कोणाचं काहीच चालत नाही, असं सत्य स्वीकारत त्यांनी स्वतःच्याच मनाची समजूत घातली.

reema-lagoo-3

नयनने आठवीमध्ये हुजूरपागा शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत नवीन आलेल्या मुलींना वेगळ्या तुकडीत प्रवेश दिला जातो. पण नयनने अभ्यासात मेहनत घेऊन पुढे प्रत्येक इयत्तेत वरच्या तुकडीत गेली होती. मी तिला मराठी आणि गणित शिकवायचे. तिने वैयक्तिक पातळीवर अनेक बक्षिसं तर मिळवलीच. पण शाळेचं नावं ही अनेक स्पर्धांमध्ये मोठं केलं. आंतरशालेय नाट्यस्पर्धांमध्ये ती हिंदी, मराठी या दोन्ही भाषांमधल्या नाटकांमध्ये काम करायची आणि हमखास बक्षिसं मिळवून यायची.

reema-lagoo

शाळेत असताना तिने ‘काबुलीवाला’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांमध्ये काम केले होते. पण मला आजही तिचा ‘काबुलीवाला’ नाटकातला अभिनय आठवतो. या नाटकात तिन साकारलेली भूमिका बघून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचं. तिने अनेक नाटकांमध्ये काम केले, पण तिने अभिनय केलेला ‘काबुलीवाला’ मी आजही विसरू शकत नाही. अशा हरहुन्नरी नयनला शाळेत अनेकदा पुरूषी भूमिकाच कराव्या लागायच्या. पण तिने कधीही याची तक्रार केली नाही. उलट उत्साहाने ती कुठलीही भूमिका करायला तयार असायची. तिचं नाटकाच पाठांतर चोख असायचं. तिला कधीही प्रॉम्पटरची गरज लागली नाही. हा वारसा तिला तिच्या आईकडूनच मिळाला असेल, यात काही शंका नाही.

reema-lagoo-2

reema-lagoo-5

पण इतर मुलींप्रमाणे तिही तेवढीच खोडकर होती. ते वयच तसं असतं म्हणा. शिपायांची नक्कल करणं, शिक्षकांची नक्कल करणं तिला आवडायचं. शाळेत आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या स्मिता तळवळकर, नयन भडभडे यांनी खरंच शाळेचं नाव मोठं केलं. एवढी मोठी अभिनेत्री झाली तरी तिची वागणूक कधी बदलली नाही. तिचे पाय नेहमीच जमिनीवर असायचे. आपल्या विद्यार्थिनीच्या आठवणींमध्ये रममाण झालेल्या जयश्रीबाईंना ती या जगात नाही, हे दुःख पचवणं कठीण जात होतं.

– मधुरा नेरुरकर, सागर कासार

madhura.nerurkar@indianexpress.com

First Published on May 18, 2017 2:52 pm

Web Title: marathi bollywood actress reema lagoo childhood memories of hujurpaga school