करोनामुळे जगभरातच नव्हे तर राज्यातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नागरी भागात १४४ कलम लागू करण्यात आलं. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय लोकलसेवाही बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. अशातच आता मराठी कलासृष्टीकडूनही लोकांना आवाहन करण्यात येतंय. मराठी कलाकारांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, रवी जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सचिन पिळगावकर, अवधुत गुप्ते, अभिजीत खांडकेकर हे सर्व कलाकार जनजागृती करताना पाहायला मिळत आहेत. जवळपास साडेतीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये प्रत्येक कलाकाराने चाहत्यांना नम्र आवाहन केलंय.

आणखी वाचा : खरे हिरो! नचिकेत बर्वेच्या वडिलांचा आदर्श घ्या

भारतात सध्या करोनाचे एकूण ३९३ रुग्ण सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे.