आज जागतिक महिला दिन..स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा विशेष दिवस. या दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. मराठी कलाकारांनी खास संदेश चाहत्यांना दिला आहे.

तितिक्षा तावडे (सरस्वती)– स्त्री म्हणून जन्मल्याचा अभिमान बाळगा!

‘मला स्त्री म्हणून जन्मल्याचा अभिमान आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याबद्दल मी नाखूष आहे किंवा मला तक्रार करावीशी वाटते. आजच्या दिवशी माझा स्त्रियांसाठी एकच संदेश असेल, कोणासाठी वा कशासाठी कधीही स्वत:ला बदलू नका, ज्याक्षणी तुम्ही स्वत:वर प्रेम कराल आणि आनंदी रहाल त्या क्षणापासून तुम्हाला दुसऱ्यांसाठी काही करण्याची वा स्वत:ला बदलण्याची गरज भासणार नाही.’

ऋजुता देशमुख (आवली- तू माझा सांगाती)– महिलांनीच महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक!

‘महिलांनीच महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन काही ठिकाणी बदलायला हवा. आपणच एकमेकींना साथ दिली तर कदाचित वर तोंड करून आपल्याला विरोध करणाऱ्यांची वृत्ती कमी होण्याची शक्यता आहे. महिला म्हणून आपण वैविध्यपूर्ण भूमिका प्रेमाने पार पाडतो, एखाद्या परिस्थितीकडे भावूक पद्धतीने बघतो आणि ताकदीनिशी आपलं नाव व्यवसायातदेखील कमावतो. या सगळ्यामुळे महिला असल्याचा मला अभिमान वाटतो.’

भाग्यश्री लिमये (अमृता घाडगे – घाडगे & सून )– इतरांची ढाल बनायचं!

‘मी मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. याचं कारण मला घरातून कधीही मुलगी आहे म्हणून दुय्यम वागणूक मिळाली नाही, उलट माझे सर्व लाड माझ्या आई बाबांनी पुरवले. उच्च शिक्षण घेऊनही मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच ठरवलं तेव्हाही बाबांनी मला सर्वार्थाने पाठींबा दिला. म्हणून मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न आज साकार करू शकले. आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सर्वांना सांगावसं वाटतं की, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच मुलींनो..स्त्री असल्याचा अभिमान बाळगा. जिजाऊ सावित्रीबाई, रमाबाई यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त पुढे जायचं आणि इतरांसाठी ढाल बनायचं.’

चिन्मय उदगीरकर (अक्षय घाडगे – घाडगे & सून)– स्त्री ही सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे!

स्त्री ही सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. सहनशीलता, परिस्थितीशी जुळवून घेणे, माणसा माणसातील नाते संबंध टिकण्याच्या दृष्टीने जो समंजस स्वभाव लागतो या सगळ्या अनुषंगाने. त्यामुळे स्त्रियांनी खंबीरपणे प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं. तिला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही असं मला वाटतं.

सचित पाटील (प्रेम देशमुख – राधा प्रेम रंगी रंगली)– पुरूषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे

लहानपणापासून माझ्या आईचं जे योगदान आहे, माझ्यासाठी केलेली मेहेनत त्यामुळे मी इथे आहे. आणि आता माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जिथे जिथे मला गरज भासते ती न सांगता तिथे असते. जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याच्यामागे महिलेचं योगदान असतं. मला महिलांना नाहीतर पुरूषांना संदेश द्यावासा वाटतो… कि,पुरुषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

वीणा जगताप (राधा देशमुख – राधा प्रेम रंगी रंगली) – धीट बना

या वर्षी महिलादिनानिमित्त मी सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते की धीट बना! देवाने स्त्रीला सगळ्यात मोठा हक्क दिला आहे तो म्हणजे एका दुसऱ्या जिवाला या जगात आणण्याचा. म्हणजे स्त्रीमध्ये किती सामर्थ्य, किती शक्ती आहे याची जाणीव ठेवा.