20 September 2018

News Flash

सेलिब्रिटी रेसिपी : अलका कुबल सांगताहेत त्यांच्या आवडत्या पदार्थाची रेसिपी

'घरी पाहुणे आले तरी खव्याच्या करंज्यांचा आग्रह करतात.'

अलका कुबल

सध्या दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसं पाहिलं तर दिवाळीला सुरुवातही झाली आहे. कारण, वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते असं म्हणतात. यंदा सण इतक्या पटापट आल्यामुळे गृहिणींची चांगलीच धांदल उडतेय. त्यातही दिवाळीच्या फराळासाठीची लगबग, तो नीट होतोय की नाही यासाठी जीवाला लागून राहिलेली हुरहूर या साऱ्या गोष्टी सध्या घराघरात पाहायला मिळत आहेत. अशा या सणाच्या शुभमूहुर्तावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ काही पाककृती तुमच्या भेटीला आणत आहे. ह्या पाककृती तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी सांगितल्या आहेत.

HOT DEALS
  • Gionee X1 16GB Gold
    ₹ 8990 MRP ₹ 10349 -13%
    ₹1349 Cashback
  • jivi energy E12 8GB (black)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%
    ₹280 Cashback

दिवाळी म्हटलं की गोडधोड हमखास येतं. लाडू, शंकरपाळ्या, करंज्या हे सर्व पदार्थ घरी बनवलेच जातात आणि गोड खाणाऱ्यांना हे पदार्थ कितीही दिले तरी कमीच असतात. अभिनेत्री अलका कुबल दिवाळीतील त्यांची खास पाककृती खव्याच्या करंज्या तुमच्यासोबत शेअर करत आहेत. तर जाणून घेऊयात या पाककृतीबद्दल…

त्यासाठी लागणारं साहित्य आहे-

खवा – पाव किलो
खोवलेलं सुकं खोबरं – पाव किलो
पिठी साखर – अर्धा किलो
ड्राय फ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता) पावडर – १ मोठी वाटी
वेलची पावडर – ४ टेबलस्पून
जायफळ पावडर – २ टेबलस्पून
खसखस – २ टेबलस्पून
बारीक रवा – २ वाटी
मैदा – १ वाटी
तूप
आरारूट पावडर

सेलिब्रिटी रेसिपी : करंज्यांना मिळाला फुलवाचा टच

कृती-

– खोवलेलं सुकं खोबरं मंद गॅसवर भाजून घ्या.
– त्यानंतर खसखस भाजून घ्या.
– सुकं खोबरं आणि खसखसनंतर खवा मंद गॅसवर भाजून घ्या.
– खवा थंड झाल्यावर त्यात भाजलेलं सुकं खोबरं, खसखस, पिठी साखर, ड्रायफ्रूड पावडर, वेलची आणि जायफळ पावडर एकत्र करून घ्या. हे झालं सारण तयार.
– मैदा आणि रवा एकत्र करून २ टेबलस्पून कडकडीत गरम तुपाचं मोहन घालावं. त्यानंतर दूध घालून पीठ मळून घ्यावं आणि २० मिनिटे झाकून ठेवावे.
– दुसरीकडे एका वाटीत थोडंसं तूप आणि आरारुट पावडर यांची पेस्ट तयार करावी.
– पीठाचा एक गोळा एकदम पातळ लाटून घ्यावा. त्यावर बोटाने खळगे करून तूप आणि आरारुट पावडरची पेस्ट लावावी. पीठाचा आणखी एक गोळा लाटून घेऊन ही पोळी पहिल्या पोळीवर ठेवावी. त्यावर पुन्हा बोटाने खळगे करून पेस्ट लावावी. पोळीचा घट्ट रोल करून त्याचे तुकडे करावे. लेअर असलेली बाजू वर ठेवून पुरी लाटावी.
– पुरीत एक-दीड चमचा सारण भरून कडा सील कराव्यात. कातणाने जास्तीची कड कापून घ्यावी.
– कढईत तूप गरम करून करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

अलका कुबल यांच्या घरी दिवाळीत खव्याच्या करंज्या आवर्जून बनवल्या जातात. घरी पाहुणे आले तरी खव्याची करंजी करण्यासाठी मला आग्रह करतात, असं त्या म्हणतात.

First Published on October 18, 2017 5:42 am

Web Title: marathi celebrity actress alka kubal sharing her diwali special recipe how to make khavyachi karanji