अरे बापरे मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यापासून शक्य तितके दूर पळा या भीतीवर मात करण्यास मराठी चित्रपट हळूहळू यशस्वी ठरत असल्याचे सुचिन्ह स्पष्ट होत आहे. मोठा हिंदी चित्रपट म्हणजे प्रसार माध्यमात मराठी चित्रपट एका बाजूला ढकलला जाणे, तसेच मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाला जेमतेम एखादा खेळ मिळणे अशी अवस्था असते आणि यावरून  मग ‘मराठी चित्रपटावर अन्याय होतो’ अशी ओरड सुरू होते. पण नजिकच्या दिवसात ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘मद्रास कॅफे’, ‘सत्याग्रह’ आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ असे काही बहुचर्चित हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असले तरी त्याच स्पर्धेत ‘७२ मैल – एक प्रवास’, ‘नारबाची वाडी’, ‘वंशवेल’, ‘पोपट’, ‘तेंडुलकर आऊट’, ‘गंगूबाई नॉन मॅट्रीक’,’ माझ्या नव-याची बायको’ आणि ‘माय डियर यश’ असे काही मराठी चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहेत. काही कारणास्तव प्रदर्शन पुढे ढकललेला ‘सत ना गत’ हा चित्रपटही याच सुमारास झळकेल. तर ‘आजोबा’ चित्रपटाची चर्चा सुरू राहिल.
यासंदर्भात, ‘पोपट’ चा दिग्दर्शक सतिश राजवाडे याने म्हटले की, माझ्या चित्रपटासाठी २३ ऑगस्ट ही तारीख खूप लवकरच निश्चित करण्यात आली असून आजच्या ‘युवा’ पिढीचा हा चित्रपट आहे. त्या सुमारास अन्य कोणते हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत याकडे लक्ष देणे मला फारसे गरजेचे वाटत नाही.
तर ‘७२ मैल – एक प्रवास’ या चित्रपटाची कार्यकारी निर्माती अश्विनी यार्दी म्हणाली की, मराठी चित्रपटाकडून प्रेक्षक नेहमीच चांगल्या व वेगळ्या कथेची अपेक्षा ठेवतो. ती गरज पूर्ण होत असेल तर हिदी चित्रपटाच्या स्पर्धेची भीती ती का बाळगायची?