मराठी चित्रपटसृष्टीने आतापर्यंत मोठा पल्ला पार केला असून तो सध्या रोमांचक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. यशाचा प्रवास असाच सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोच्च शिखर गाठण्याची क्षमता असल्याचे ठाम मत सुपरस्टार सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘कट्ट्यार काळजात घुसली’ चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

मराठी चित्रपटांचे स्वरुप आज बदलले असून मराठी चित्रपट आज जागतीक स्तरावर गाजत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपट आज मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहीलेले नाहीत, असेही सचीन पिळगावकर म्हणाले.

तेलगु, मल्याळम, तामिळ, बंगाली, कन्नड या भाषांतील सिनेमांचाही दर्जा वधारल्याचे सांगत स्थानिक भाषांतील सिनेमे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे सचिन यावेळी म्हणाले.

‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील भूमिकेसाठी उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी मीना कुमारजी यांच्याकडून धडे घेतल्याचे सचिन यांनी सांगितले. यात त्यांचे शेजारी मजरुफ सुलतानपुरी साहेब (कवी) यांच्याकडूनही बरेच काही शिकायला मिळाल्याचाही उल्लेख त्यांनी केला.