चित्रपट पाहून दिग्दर्शकाशी संवाद साधल्यावर काही वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी समजतात. (सध्या नेमके उलटे चालले आहे, म्हणून जाणकार रसिक नाराज आहेत.) ‘नारबाची वाडी’ पाहताना दिग्दर्शक आदित्य अजय सरपोतदार याच्या दिग्दर्शनीय हाताळणीतील प्रगतीची कल्पना येते म्हणून तर चित्रपटाने चांगले व्यावसायिक यश मिळवले. आदित्यची भेट होताच त्याला हे लक्षात आणून देताच तो म्हणाला, यावेळी मी कामाची पध्दत बदलली. यापूर्वी मी माझ्या दृष्टिने जे योग्य त्यानुसार सगळी तयारी करायचो. यावेळी मी कथा-कल्पना निश्चित करून मग पटकथाकारापासून प्रत्येक कलाकाराला काय योग्य वाटते हे जाणून घेतले आणि त्यानुसार चित्रपट आकाराला आणत गेलो. सगळ्यांचा भावनिक सहाभाग चित्रपटाचा दर्जा वाढण्यात उपयोगी पडतो. हे या चित्रपटाकडे पाहताना आता लक्षात येते. तात्पर्य, या चित्रपटाच्या यशाचे श्रेय सगळ्यांचे आहे. मराठीतील नवीन पिढीतील दिग्दर्शकांची काम करण्याची शैली खूप वोगळी आणि स्वतंत्र आहे, त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी मराठीतील दर्जेदार चित्रपटांचे प्रमाण जास्त आहे. पुढील वर्षी ते यापेक्षाही जास्त असेल. मराठी चित्रपटाचा प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपट पाहू लागला आहे, त्यामुळे सगळ्यांचीच उमेद, उत्साह वाढला आहे, वगैरे वगैरे.