नीलेश अडसूळ

मराठी प्रेक्षकांचे समाधान केवळ कौटुंबिक आशयाने झाले असे होणे शक्यच नाही. इथल्या रसिकवर्गाला असलेली रंजनातून नवरस चाखण्याची सवय अगदी पूर्वापार आहे. मुळात मराठी मातीतील मनोरंजनाची सुरुवात भारूड, तमाशे, बतावणी, शक्तीतुरा, दशावतार अशा लोककला प्रकारातून झाल्याने इथले लोक विनोदाच्या गोडीसोबत विनोदाची पारखही चोखंदळपणे करतात. त्यामुळे लोककलेनंतर विनोदाची पालखी नाटय़कर्मीनी आपल्या खांद्यावर घेत आजही तो वारसा समर्थपणे चालवल्याचे दिसते. पुढे त्यात चित्रपटानेही उडी घेतली आणि अनेक विनोदी चित्रपटांची निर्मिती मराठीमध्ये होऊ लागली. गणपत पाटील, राजा गोसावी, शरद तळवलकर, अशोक सराफ, कुलदीप पवार, किशोर नांदलस्कर, मच्छिन्द्र कांबळी, प्रकाश इनामदार, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम ते आताच्या भरत जाधव, केदार शिंदे, वैभव मांगले, भाऊ  कदम, अतुल तोडणकर आणि अजून बरेच कलाकार हे विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाचा उल्लेख करायचा झाला तर मोजण्यासही कठीण जाईल इतके विनोदवीर मराठी कलाक्षेत्रात घडले आहेत. यात अभिनेत्रीही मागे राहिल्या नाहीत, रसिका जोशी, निर्मिती सावंत ते आताच्या विशाखा सुभेदार, प्राजक्ता हनमघर, नम्रता आवटे अशा अभिनेत्री हिरिरीने विनोदाची धुरा पेलत आहेत.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

विनोदाच्या या वारीत मालिकाही मागे राहिल्या नाहीत. नाटक आणि चित्रपटांसोबतच मालिकांनीही विनोदाला प्राधान्य दिले. गेल्या दोन दशकभरात झालेल्या ‘घडलंय- बिघडलंय’, ‘टिकल ते पोलिटिकल’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘हसा चकट फु’, ‘साहेब, बीबी आणि मी’, ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकांनी स्वत:चे अजरामर स्थान निर्माण केले. श्रीरंग गोडबोले, रसिका जोशी, मुक्ता बर्वे, विजय कदम, जितेंद्र जोशी आदी दिग्गज कलावंतांनी घडलंय-बिघडलंय या मालिकेतून विनोदाचा धुडगूस घातला होता. विनोदा सोबतच प्रहसन करून सामाजिक आणि राजकीय विषयावर खोचक भाष्य करणारी ही मालिका आजही चिरतरुण आहे. सुहास परांजपे, मकरंद अनासपुरे, समीर चौगुले, त्यागराज खाडिलकर यांच्या फटकेबाजीने रंगलेली पण राजकीय आणि सामाजिक जीवनाचा विनोदातून वेध घेणाऱ्या  टिकल ते पोलिटिकल या मालिकेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. पुढच्या काळात भारत जाधव, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळे, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, माधुरी कांबळे, माधवी जुवेकर, नीलम शिर्के अशा कलावंतांनी विनोदाची पातळी अगदी वरच्या स्तरावर नेऊन ठेवली. सामान्य माणसांच्या व्यथा आणि जगण्यातले बारकावे टिपत त्यावर खळखळून हसायला लावणाऱ्या ‘हसा चकट फु’ या मालिकेने चाकरमानी वर्गाला एकेकाळी मोठा दिलासा दिला. तर निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळे यांची जुगलबंदी गंगुबाईच्या रूपाने अनेक वर्ष मनावर अधिराज्य करून गेली. गिरीश ओक, नीलम शिर्के, अंजली वळसंगर, सई ताम्हणकर यांच्या नाठाळ कौटुंबिक नाटय़ाने बहरलेली ‘साहेब, बीबी आणि मी’ ही मालिका विनोदाला नवे वळण देऊ न गेली. या मालिकांनंतर मधला काळ बराचसा कौटुंबिक आशयात गेला. आजही विनोदी मालिका होत आहेत; परंतु विनोदाचा तो जुना बाज कुठेतरी हरवल्याची खंत आहे.

ही कसर नंतरच्या काळात रिअ‍ॅलिटी शोजनी भरून काढली, असं म्हणावं लागेल. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या हिंदी रिअ‍ॅलिटी शोच्या धर्तीवर मराठीमध्ये ‘हास्यसम्राट’ हा रिअ‍ॅलिटी शो आणला गेला. त्यानिमित्ताने मराठीत ‘स्टॅन्डउप कॉमेडी’ची बीजे रुजली गेली. या मालिकेतून प्रा. दीपक देशपांडे, अजितकुमार कोष्टी, मिर्जा रफी बेग यांसारखे अस्सल विनोदवीर मिळाले. तर ‘फु  बाई फु ‘ आणि ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या मालिकांनी ‘स्किट’ या नव्या प्रकारची ओळख मराठी प्रेक्षकांना करून दिली. या दोन्ही मालिका इतक्या लोकप्रिय ठरल्या की यांची अनेक पर्व येऊ न गेली. ‘मालवणी डेज’, ‘आंबट-गोड’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘सतराशे साठ जाऊ बाई’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘नसते उद्योग’ अशा अनेक मालिका आल्या आणि गेल्या परंतु अजरामर विनोद करण्यात त्या कुठेतरी कमी पडल्याचे जाणवते. ‘चला हवा येऊ  द्या’ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांनी बराच काळ सकस आणि निखळ विनोद अनुभवला. असे असले तरी रसिक प्रेक्षकांना रडवणे-चिडवणे एक वेळ सहज शक्य होईल विनोदातून रसिक प्रेक्षकांना हसवणे हे मात्र कठीण. विशेष म्हणजे विनोद करणारा विनोदवीर मूळ स्वभावाने विनोदी असतोच असे नाही. त्यामुळे विनोदाची फेक, वाक्यांमधला ठेहराव, समयतत्परता, शब्दचातुर्य, द्वयर्थता याचे भान बाळगून हे विनोद रसिकांपर्यंत पोहचवावे लागतात.

टिकल ते  पोलिटिकलपासून आपल्या विनोदी लेखनाचा प्रवास सुरू केलेले समीर चौगुले यांनी आजही  हसवण्याची ही सेवा अविरत सुरू ठेवली आहे. सध्या ते ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘कॉमेडीची हास्यजत्रा’ या मालिकेतून स्किट लेखन आणि अभिनय देखील करत आहेत. स्किट लेखनाविषयी ते सांगतात, लेखकाने कायम आपले कान आणि डोळे उघडे ठेवायला हवे. विनोद हा विसंगतीतून घडत असल्याने त्या विसंगतीकडे आपले लक्ष हवे.  महाविद्यालयात असताना आमचे दिग्दर्शक विश्वास सोहनी यांनी आम्हाला  इम्प्रोवाईजेशन/ कल्पनाविस्तार कसा करा याचे कौशल्य शिकवले होते. एका ओळीपासून तीन पानाचे स्क्रिप्ट कसे करायचे हे याच कौशल्यातून अवगत झाले. पण त्यातही वेगळेपणा असायला

हवा. आज एक हजारांहून अधिक स्किट लिहूनही मी सातत्याने नावीन्य शोधात राहतो. कारण समाजमाध्यमांमुळे अनेक विनोद हे व्हायरल होत असतात. आणि आपण केलेला विनोद त्याच्याशी साधम्र्य साधणारा असला की पुन्हा लोकांचे संशय बळावतात. वास्तविकत: एका वेळी एक  विनोद अनेकांना सुचू शकतो. त्यामुळे आपण काय हटके देऊ  शकतो याचा विचार सातत्याने सुरू असल्याचे समीर सांगतो. विनोदातच नव्हे तर विषयातही नावीन्य आणावे लागते. आज हिंदी आणि स्टॅन्डअप कॉमेडीमुळे विनोदाचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. त्यामुळे लोकही विनोदाशी परिचित झाले आहेत. जोवर नवे काहीतरी ऐकायला मिळत नाही तोवर ते हसत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विनोद सादर करण्यापेक्षा तो लिहिणे कठीण होत चालले आहे. आपल्याला पात्र शोधता यायला हवी मग ते लग्न असो, रस्ता असो किंवा आपल्या कामाचे ठिकाण असो. सवयीने या गोष्टी हळूहळू जमत जातात. पण हे  काम कौशल्याशिवाय शक्य नाही, असेही समीर सांगतो.

झी मराठीवरील ‘जागो मोहन प्यारे’ आणि नुकतीच आलेली ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेतील नायक अतुल परचुरे यांनी गेली अनेक वर्ष विनोदी अभिनेता म्हणून काम केले आहे. ते अभिनयाविषयी सांगतात, विनोदी अभिनेत्याला समाजाचे भान असायला हवे. कारण त्याशिवाय विनोदाची जाण निर्माण होत नाही. लेखकाने लिहिलेले विनोद अभिनेत्यापर्यंतच पोहचले नाही तर प्रेक्षकांपर्यंत तो काय पोहचवणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे अभिनेत्याने सजग असायला हवे. बऱ्याचदा चित्रीकरणादरम्यान संहितेच्या पलीकडचे अनेक विनोद हे ओघाओघाने येऊ नही जातात. आणि प्रसंगाला अजूनच मजा येत जाते. विनोदी अभिनयाच्या बाबतीत सांगायचे झाले तर इतर अभिनयापेक्षा विनोदी पात्राला असलेले कंगोरे काहीसे वेगळे असतात. कारण हे पात्र कायम सगळ्यांपेक्षा वेगळे असते. जसे ‘जागो मोहन प्यारे’मधला मोहन हा एवढा बुजरा आणि साधा आहे की त्याचा साधेपणा टिकवणे हेच त्या मालिकेतील विनोदनिर्मितीचे  गमक आहे. विशेष म्हणजे लोक मालिकेशी  एकरूप होत असल्याने हळूहळू त्यांना पात्र परिचयाचे होते त्यामुळे पात्राच्या पलीकडे जाऊन त्या पात्राचा विचार करावा लागतो, असे अतुल सांगतात. तर नाटकातील आणि मालिकेतील विनोदाच्या वेगळेपणा विषयी ते म्हणतात, नाटकातील विनोद हा प्रयोगशील असतो, त्यात प्रयोगानुसार बदल करता येऊ  शकतात, किंवा प्रयोगानुसार तो अधिक सशक्त होत जातो. पण मालिकेची कालमर्यादा कमी असल्याने तिथले विनोद हे काही मिनिटांत आणि चपखलपणे पोहोचणारे असायला हवे. कारण केवळ पंचवीस मिनिटे एवढाच अवधी अभिनेत्याला प्रेक्षकांना हसवण्यासाठी असतो, असे त्यांनी सांगितले.

काळानुसार विनोदी अभिनेते, लेखक यांच्यासमोरची आव्हाने बदलत चालली आहेत. तंत्र प्रगत होत चालले आहेत तसे मालिका, रिअ‍ॅलिटी शो, ओटीटी प्लॅटफॉम्र्स अशी वेगवेगळी माध्यमे खुली होत असताना विनोद मांडण्यापासून तो अभिनयातून लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कलेत सर्जनशीलता नसेल तर विनोदाचा हा वार फिका पडण्याची शक्यताच जास्त, असे ही मंडळी ठामपणे सांगतात.