पुणे : चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या जोडीचा उलगडलेला प्रवास.. टाळ्यांची दाद मिळवणारे रंजक किस्से.. लोकप्रिय आणि अवीट गाण्यांची साथ.. निमित्त होते सिम्बायोसिसतर्फे आयोजित २६व्या महोत्सवाचे..

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी  झाले. याच कार्यक्रमात माजी विद्यार्थी अभिनेता भूषण प्रधानला ‘सिम्बायोसिस सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका विद्या येरवडेकर आदी या वेळी उपस्थित होते. आरजे स्मिता यांनी जितेंद्र आणि जयाप्रदा यांच्याशी संवाद साधला, तर मकरंद पाटणकर आणि सहकाऱ्यांनी गाजलेली गीते सादर केली.

‘माझ्या मनात मराठी संस्कृती भिनलेली आहे. व्ही. शांताराम यांनी मी पंजाबी असूनही चांगले मराठी बोलतो हे पाहून मला चित्रपटात काम दिले. गिरगावातील वीस वर्षे माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. ते खरे आनंदाचे क्षण होते. चित्रपटातील माझ्या नाचण्यावर समीक्षक टीका करायचे. जम्पिंग जॅक हे नाव टीका म्हणून दिले गेले. पण मी त्याकडे सकारात्मकतेने पाहिले,’ असे जितेंद्र म्हणाले. जयाप्रदा म्हणाल्या, ‘तीन मिनिटांच्या भूमिकेपासून सुरू झालेला चित्रपटातील प्रवास तीस वर्षे सुरू राहिला. आमच्या काळात चित्रपट प्रशिक्षण संस्था नव्हत्या. दिग्दर्शकांकडून, आजूबाजूच्या लोकांकडूनच शिकत गेले. आव्हानांना सामोरे जाणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे अभिनयाप्रमाणेच राजकारणातही आत्मविश्वासाने काम केले.’

जीवनात भोगण्यापेक्षा त्याग करणे आवश्यक

पूर्वीच्या चित्रीकरणावेळी दारूच दिसायची. सर्व अभिनेते व्यसन करायचे. मीही धूम्रपान, मद्यपान करायचो. वीस वर्षांपासून व्यसने सोडून दिली. व्यसन हे मोठेपणाचे लक्षण नाही. आजचे कलाकार तंदुरुस्तीकडे लक्ष देतात.  ते व्यसनापेक्षा फिटनेसकडे  लक्ष देतात. मी व्यसनमुक्त आयुष्य त्यांच्याकडून शिकलो. जीवनात भोगण्यापेक्षा त्याग करणे गरजेचे आहे, अशी भावना जितेंद्र यांनी व्यक्त केली.