निर्माता दिग्दर्शक रवी जाधवने सातत्याने दर्जेदार चित्रपट देण्याचा जणू पायंडाच पाडला आहे. विविध विषयांना न्याय देणाऱ्या चित्रपटासोबतच तो काही चांगल्या चित्रपटांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ता म्हणूनही खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘दगडी चाळ’च्या यशानंतर अमोल ज्ञानेश्वर काळे निर्मित आगामी ‘यंटम’ चित्रपटाच्या प्रस्तुतीमध्येही रवी जाधव फिल्म्सचा हातभार लागला असून, अतुल ज्ञानेश्वर काळे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘यंटम’ ही तरुणाईच्या जवळ जाणारी मनाला भावणारी, टवटवीत आणि म्युझिकल प्रेमकहाणी असून, २ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ही कहाणी पाहता येणार आहे.

‘रवी जाधव फिल्म्स’ अंतर्गत अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रेगे’, प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘कॉफी आणि बरंच काही’ हे दोन चित्रपट प्रस्तुत करण्यात आले होते. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरले. त्यामुळेच आता आगामी ‘यंटम’बद्दलही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. “यंटम” हे आगळंवेगळं नाव असलेला नवा चित्रपट रवी जाधव प्रस्तुत करत आहेत त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतुहल वाढलं आहे. तारुण्यावस्थेतील एक सुरेख प्रेमकहाणी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. पण, फक्त प्रेमकहाणीपर्यंतच सीमित न राहता या चित्रपटातून जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोनही देण्यात येणार आहे.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

या चित्रपटाशी जोडले जाण्याविषयी रवी जाधवने म्हणाला, “काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटात मी अभिनय केला, ‘न्यूड’ ( चित्रा ) चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हे दोन्ही चित्रपट अत्यंत वेगळ्या धाटणीचे आणि तितकेच आव्हानात्मकही होते. सरत्या वर्षाप्रमाणेच येणारे वर्ष म्हणजेच २०१८ हे वर्ष मात्र माझ्यासाठी एकदम वेगळे असणार आहे. या वर्षी काही सहज, सोप्या, सामान्य माणसांच्या स्वप्नांच्या कथा, तर असामान्य कर्तृत्वामुळे गाजलेल्या प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा माझा मानस आहे. ‘यंटम’ हे त्यातीलच एक पाऊल ‘यंटम’ म्हणजेच वेडेपणा. आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातील तरूणांची अत्यंत तरल प्रेमकथा, ज्यात दाहक वास्तवतेचा पदर आहे व प्रेमात काहीही करण्याचा वेडेपणा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सयाजी शिंदेंसोबत काम करण्याचाही योग जुळून येतोय, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटात बरेच कलाकार पहिल्याच वेळेस मोठ्या पडद्यावर काम करत आहेत. मला आशा आहे, की प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोचवण्यात माझा थोडाफार हातभार लागेल व या सर्व नव्या कलाकारांची या क्षेत्रात यशस्वी सुरुवात होईल.”